मराठवाडा साहित्य परिषद अहमदपूरच्या वतीने एक दिवसीय भव्य चौथे मराठी साहित्य संमेलन
अहमदपूर(१०), प्रतिनिधी:-
अहमदपूर तालुक्यातील किणी कदू येथील बसवसृष्टी संविधान पार्क येथे रविवार, दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी मराठवाडा साहित्य परिषद, शाखा अहमदपूर यांच्या वतीने “जागल” एक दिवसीय चौथ्या मराठी साहित्य संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक प्रबोधनाची परंपरा जपणाऱ्या या संमेलनाकडे संपूर्ण लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील साहित्यप्रेमींचे लक्ष लागले आहे.
या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून प्रा.फ. म. शहाजींदे (ज्येष्ठ कवी) लाभले असून, उद्घाटक म्हणून माननीय बाळासाहेब जाधव, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री. संजय पाटील, माजी सरपंच, किणी कदू तर निमंत्रक म्हणून डॉ. भीमराव पाटील, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर हे जबाबदारी सांभाळत आहेत.
संमेलनाचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता होणार असून या एक दिवसीय साहित्य संमेलनात सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
परिसंवादाच्या सकाळच्या सत्राचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. अनिल मुंडे, महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर हे “समाज बांधणीत संतांचे योगदान” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. संत परंपरेने समाजाला दिलेली मूल्ये, समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक परिवर्तनातील त्यांचे योगदान यावर अभ्यासपूर्ण चर्चा या परिसंवादात होणार आहे.
दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर दुपारी 2 ते 4 या वेळेत कवी संमेलन पार पडणार आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून योगीराज वाघमारे, लातूर हे लाभले असून, जिल्ह्यातील व परिसरातील नामवंत कवी आपल्या रचनांमधून साहित्यप्रेमींना समृद्ध अनुभव देणार आहेत.
मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेली मराठवाडा साहित्य परिषद ही संस्था केवळ साहित्यिक मंच नसून सामाजिक प्रबोधनाची प्रभावी चळवळ आहे. नव्या पिढीला वाचन, विचार आणि अभिव्यक्तीकडे प्रवृत्त करणे, लोकशाही मूल्यांची जोपासना करणे आणि मराठी भाषेचे अस्तित्व अधिक बळकट करणे हे या परिषदेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
या पार्श्वभूमीवर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष सत्यनारायण काळे तसेच कार्यवाहक द. मा. माने यांनी लातूर जिल्ह्यातील व परिसरातील सर्व साहित्यप्रेमी, कवी, लेखक, अभ्यासक, विद्यार्थी व वाचकांनी या “जागल” एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
मराठी साहित्याच्या विचारमंथनासाठी आणि संस्कृतीच्या जतनासाठी हे संमेलन एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, साहित्यप्रेमींनी या पर्वणीचा लाभ घ्यावा, तसेच या साहित्य संमेलनाचा समारोप सायंकाळी 5 वाजता होणार असल्याचे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.
