धम्मचारी अनोमदस्सी लिखित ‘बौद्ध विचारधन’ पुस्तकाचे २४ जानेवारीला मुंबईत प्रकाशन
गो. ल. कांबळे यांजकडून-
उमरगा — बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक, भाष्यकार तसेच त्रिरत्न बौद्ध महासंघाचे ज्येष्ठ उपाध्याय धम्मचारी अनोमदस्सी लिखित ‘बौद्ध विचारधन’ या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा शनिवार, दि. २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मुंबई येथील प्लाझा सिनेमा समोरील राजर्षी शाहू महाराज सभागृह, शिवाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.

गेली अनेक वर्षे धम्म प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या धम्मचारी अनोमदस्सी यांनी आपल्या धम्मप्रवचनांद्वारे व प्रशिक्षणांद्वारे अनेकांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे. ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक, व्याख्याते, समीक्षक, ध्यान प्रशिक्षक, योग व चीकुंग प्रशिक्षक म्हणून त्यांनी पालक–पाल्य कार्यशाळांच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध प्रांतांत जनकल्याणाचे कार्य केले आहे. तसेच विदेशात जाऊन धम्म प्रचार-प्रसार करण्याचे कार्यही त्यांनी यशस्वीरीत्या केले आहे.
त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संस्थापक पूज्य भंते महास्थविर उर्गेन संघरक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंड येथील केंद्रातून त्यांनी धम्म प्रशिक्षण घेतले आहे. बौद्ध धम्मावर त्यांनी यापूर्वीही अनेक पुस्तके लिहिली असून आता ‘बौद्ध विचारधन’ हे नवे पुस्तक वाचकांच्या भेटीस येत आहे.
या प्रकाशन सोहळ्यास मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. दत्तात्रय मुरूमकर आणि ज्येष्ठ बौद्ध लेखक शुक्राचार्य गायकवाड प्रमुख उपस्थित राहणार आहेत. पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ उपाध्याय धम्मचारी अमृतदीप (नागपूर) यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ उपाध्याय ज्योतींधर (पुणे) हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त प्रशासकीय अधिकारी अशोक निंबाळे असणार आहेत.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास सर्व बौद्ध उपासक व धम्मप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन धम्मचारी अनोमदस्सी व धम्मचारीनी कुशलप्रभा यांनी केले आहे.

खूप छान