डॉ. जयश्री रावण सोनकवडे–जाधव यांना मायावतींच्या बहुजनवादी कार्यावर पीएच.डी. पदवी
छत्रपती संभाजीनगर(५), प्रतिनिधी :
बहुजन समाजाच्या सामाजिक, राजकीय व प्रशासकीय सशक्तीकरणाच्या लढ्याला वैचारिक अधिष्ठान देणारा महत्त्वपूर्ण शैक्षणिक टप्पा आज साकार झाला. डॉ. जयश्री रावण सोनकवडे–जाधव, उपायुक्त, सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून समाजकार्य (Social Work) या विषयात
“मा. मायावती यांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा अभ्यास”
या अत्यंत महत्त्वाच्या, समकालीन आणि वैचारिकदृष्ट्या क्रांतिकारी विषयावर पीएच.डी. पदवी संपादन केली.
आज दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी विद्यापीठाच्या ६६ व्या वार्षिक दीक्षांत समारंभात त्यांना ही पदवी औपचारिकरित्या प्रदान करण्यात आली. हा मानाचा क्षण मा. प्रा. डॉ. सुनील भागवत, संचालक – भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER), पुणे यांच्या हस्ते साकार झाला.
या भव्य दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. विजय फुलारी, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांनी उपस्थिती लावली. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सुनील भागवत यांची उपस्थिती समारंभाच्या शैक्षणिक, बौद्धिक व वैचारिक उंचीला विशेष अधोरेखित करणारी ठरली. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
केवळ शैक्षणिक नव्हे, तर चळवळीचे यश
हे यश केवळ वैयक्तिक किंवा शैक्षणिक चौकटीत मर्यादित नाही, तर ते बहुजन समाजाच्या संघर्षशील इतिहासाला, स्वाभिमानाच्या लढ्याला आणि भारतीय संविधानावर आधारित परिवर्तनवादी चळवळीला मिळालेले ठोस वैचारिक बळ आहे.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून मा. मायावती यांनी उभारलेले राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय सशक्तीकरणाचे कार्य हे केवळ सत्ताकेंद्रित न राहता प्रतिनिधित्व, आत्मसन्मान, सामाजिक न्याय आणि संविधानाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे जिवंत उदाहरण ठरले आहे. दलित-बहुजन समाजाला सत्तेच्या केंद्रस्थानी नेण्याची, प्रशासनात सहभाग वाढवण्याची आणि सार्वजनिक अवकाशात स्वाभिमान प्रस्थापित करण्याची त्यांची भूमिका ऐतिहासिक आहे.
समाजकार्याच्या दृष्टिकोनातून निर्भय अभ्यास
या संपूर्ण कार्याचा शास्त्रीय, वस्तुनिष्ठ आणि समाजकार्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणे ही मोठी बौद्धिक जबाबदारी डॉ. जयश्री रावण सोनकवडे–जाधव यांनी अत्यंत निर्भयपणे, प्रामाणिकपणे आणि ठाम वैचारिक भूमिकेतून पार पाडली आहे. त्यांच्या संशोधनातून बहुजन राजकारण, सामाजिक परिवर्तन, प्रशासकीय निर्णयप्रक्रिया आणि संविधानिक मूल्ये यांचा परस्परसंबंध स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आला आहे.
सामाजिक न्याय चळवळीतील प्रेरणादायी टप्पा
सामाजिक न्याय विभागात उच्च पदावर कार्यरत असताना, प्रशासकीय अनुभव आणि अकादमिक संशोधन यांचा संगम साधत त्यांनी हा प्रबंध साकार केला, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. हे संशोधन आगामी काळात समाजकार्य, सामाजिक न्याय, बहुजन अभ्यास आणि सार्वजनिक धोरणांच्या क्षेत्रात संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी ठरण्याची दाट शक्यता आहे.
डॉ. जयश्री रावण सोनकवडे–जाधव यांचे हे यश बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी आणि परिवर्तनवादी कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरणारे आहे.
