संविधानाचे पालन करणे म्हणजेच शीलवान होणे: अभिनेत्री चिन्मयी सुमित
हुपरी(२१), प्रतिनिधी : ‘डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले आहे त्याचे पालन करणे म्हणजेच शीलवान होणे आहे, असे मी मानते. परिवर्तनवादी परंपरेचे वारसदार म्हणून ही आपली महत्वपूर्ण जबाबदारी आहे. भारतीय नागरिक कसा असावा हे यातुनच घडणारा असावा. यालाच राष्ट्रीय शील वा चरित्र म्हणतात आणि ते घडवणे हे व्यक्तिगत शील किंवा चरित्राइतकेच किंवा त्याहुनही महत्वाचे मानुन भगवान बुद्धांपासुन ते डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर व इतर महामानवांनी परिवर्तनाचे कार्य केले. आता आपणही सामाजिक शील घडवल्याशिवाय येऊ घातलेली अराजकता टळणार नाही. म्हणून आपण परिवर्तनवादाचे वारसदार म्हणून याची सर्वस्वी जबाबदारी घेवून भगवान बुद्धांचा व डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर यांचा मार्ग अवलंबला पाहिजे. भारतातील स्त्रियांनी तर नमस्कारा बरोबर “जय भीम” म्हटलेच पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला त्याची ताकत समजणार नाही,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी केले. त्या दहावी युवा बौद्ध धम्म परिषदेच्या मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र व कर्नाटक राज्य या संस्थेमार्फत विश्व बौद्ध धम्म ध्वज दिनानिमित्त दरवर्षी घेण्यात येणाऱ्या ह्या परिषदेच्या या दशकपूर्ती कार्यक्रमाचे उद्घाटन पूज्य भंते सीरी सारो, हुपरीचे नगराध्यक्ष मा. मंगलराव माळगे व पैसाफंड बँक, हुपरीचे एम.डी. मा. शिवराज नाईक यांनी केले. यावेळी स्वागत व प्रास्ताविक युवा बौद्ध धम्म परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ॰ किरण भोसले यांनी केले, पाहुण्यांची ओळख राज्याध्यक्ष डॉ॰ संतोष भोसले, ठराव वाचन डॉ. अतुल कांबळे, सूत्रसंचलन संदिप धम्मरक्षित आणि अभिजित म्हासुर्लीकर, आभार प्रदर्शन अभि. बापूसाहेब राजहंस यांनी केले. या प्रसंगी डॉ. अनिल माने, प्रमोद हुपरीकर, सदानंद भोसले, सतिश भारतवासी, प्रा. आदिनाथ कांबळे-तासगावकर, सुनिता खिल्लारे, मल्लेश चौगुले, दिलीप शिंगाडे आदि मान्यवर उपस्थित होते.
