किनी कदु येथे प्रथमच आगळावेगळा तीन दिवसीय राष्ट्रीय अनुभव मंटप उत्सव उत्साहात संपन्न
अहमदपूर(१०),प्रतिनिधी: किनी कदु, ता. अहमदपूर, जि. लातूर येथील बसवसृष्टी परिसरात 3 जानेवारी रोजी प्रथमच राष्ट्रीय अनुभव मंटप उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण व वैचारिक वातावरणात संपन्न झाला. सामाजिक समता, लोकशाही मूल्ये, पर्यावरण संवर्धन आणि संविधानिक जाणीव यांचा सुरेख संगम साधणारा हा उत्सव परिसराच्या वैचारिक इतिहासात मैलाचा दगड ठरला आहे.
या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूरचे सचिव मा. ॲड. माधवरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी अनुभव मंटप ही केवळ ऐतिहासिक संकल्पना नसून, आजच्या संसदीय लोकशाही व लोककल्याणकारी राज्य व्यवस्थेचा आद्य प्रयोग असल्याचे प्रतिपादन केले.
अनुभव मंटप : लोकशाहीचा मूळ गाभा:
“अनुभव मंटप : संसदीय लोकशाही व लोककल्याणकारी राज्याचा आद्य प्रयोग” या विषयावर आयोजित वैचारिक परिषदेमध्ये
सर्व शरण सच्चिदानंद आवटी, प्रा. बाबुराव माशाळकर, डॉ. दत्ता हरी होनराव, डॉ. सच्चिदानंद बिचेवार यांच्यासह अनेक नामवंत अभ्यासक व संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर करून परिषदेची वैचारिक उंची अधिक वृद्धिंगत केली.
या शोधनिबंधांचा समावेश असलेली शोध पुस्तिका लवकरच प्रकाशित केली जाणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले. परिषदेसाठी श्री. सत्यनारायण काळे, श्री कादरी यांच्यासह अनेक लेखक, विचारवंत, अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तीन राज्यांतील शरणांचा सहभाग:
या तीन दिवसीय उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या तीन राज्यांतील शरणांचा सहभाग. व्याख्याने, वाचन, गायन, नृत्य, बसवकाव्य, बसव पोवाडा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर वैचारिक आणि सांस्कृतिक ऊर्जेने भारावून गेला होता.
बसव प्रतिमेची भव्य मिरवणूक व ग्रंथालय–संग्रहालयाचे उद्घाटन:
गाव भागातील अनुभव मंटपापासून ते बसवसृष्टी या एक किलोमीटर अंतरापर्यंत बसव प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर अनुभव मंटप येथे ग्रंथालय व संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. हे ग्रंथालय भावी पिढीला विचार, इतिहास व परिवर्तनाची प्रेरणा देणारे केंद्र ठरणार आहे.
ऑक्सिजन पार्क : निसर्ग व मानव यांचा सुंदर समन्वय
बसवसृष्टी परिसरात एक हजार वृक्षांचे ऑक्सिजन झोन विकसित करण्यात आले आहे. विविध जातींच्या वृक्षांनी नटलेले हे ठिकाण मोघा धरणाच्या काठावर असल्याने नैसर्गिक दृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे.
डॉ. भीमराव पाटील सरांचे दानत्व:
बसवसृष्टीच्या निर्मितीसाठी डॉ. भीमराव पाटील यांनी स्वतःच्या मालकीची दोन एकर जमीन दान देऊन त्यामध्ये बसवसृष्टी, ऑक्सीजन झोन आणि संविधान पार्क हे तीन उपक्रम साकारले आहेत. आज हा परिसर पशु-पक्ष्यांचे आश्रयस्थळ बनला असून नागरिकांसाठी एक आवडते पर्यटन व विरंगुळ्याचे केंद्र ठरत आहे.
संविधान पार्क : मूल्यांची जपणूक करणारे केंद्र:
बसवसृष्टीतील संविधान पार्कमधून संविधानिक मूल्यांचे जागरण केले जात आहे. संविधान फलक, संविधान कट्टा यांच्या माध्यमातून जल, जंगल, जमीन, जीव, जनता, जनावरे आणि जीवनमूल्य यांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचा संदेश दिला जात आहे.
येथील बहुजन महामानवांच्या विचारांचे फलक आज सर्वांचे लक्ष वेधून घेत असून समाजमनावर खोलवर परिणाम घडवत आहेत.
मुद्रिकाईंच्या स्मृतीस अर्पण : जीवनकथेचे प्रकाशन
डॉ. भीमराव पाटील यांच्या मातोश्री मुद्रिकाई यांचे 2 जानेवारी 2025 रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त “मुद्रिकाईची जीवनकथा” हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. या ग्रंथामध्ये आईच्या त्याग, कष्ट, संघर्ष व मायेचे सविस्तर चित्रण करण्यात आले असून, मातृत्वाच्या मूल्यांची प्रभावी मांडणी करण्यात आली आहे.
समाजहिताचा आदर्श उपक्रम:
राष्ट्रीय अनुभव मंटप उत्सव हा वैचारिक समृद्धी, सामाजिक समता, पर्यावरण संवर्धन व संविधानिक जाणीव यांचा त्रिवेणी संगम ठरला आहे. हे सर्व उपक्रम केवळ एका दिवसापुरते मर्यादित नसून, समाजाच्या दीर्घकालीन हितासाठी दिशादर्शक ठरणारे आहेत.
बसवसृष्टी आज केवळ एक स्थळ न राहता विचारांची प्रयोगशाळा आणि मूल्यांची शाळा बनली आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
