सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जयंती उत्साहात साजरी
लातूर(12),प्रतिनिधी: भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती डॉ.आंबेडकर पार्क येथे अतिशय उत्साहात, अनुशासनात आणि धम्म विचाराने साजरी करण्यात आली. कार्यक्रमास विविध भागांतील बौद्ध बांधव, सामाजिक कार्यकर्ते, धम्ममार्गी तरुण तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंती सोहळ्याची सुरुवात पारंपरिक बौद्ध पद्धतीने त्रिसरण व पंचशीलाचे सामूहिक पठण करून करण्यात आली. त्यानंतर भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून उपस्थितांनी त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आणि उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. कल्याण कांबळे सर यांनी भैय्यासाहेबांच्या बहुआयामी कार्याचा गौरवपूर्वक वेध घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, बंधुता आणि प्रज्ञा-करुणा या मूल्यांना समाजमनात पोहोचवणे हे त्यांचे अजीवन ध्येय राहिले. भारतातील बौद्ध चळवळींच्या संघटनात्मक उभारणीत, युवकांना धम्ममार्गाकडे प्रेरित करण्यात, तसेच आंबेडकरी विचारसरणीला बौद्ध धम्माच्या आधाराने व्यापक दिशा देण्यात भैय्यासाहेबांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले, असे प्रतिपादन केले.
कांबळे सर पुढे म्हणाले की, “भैय्यासाहेब आंबेडकर हे केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र म्हणून नव्हे तर समता-अधिष्ठित समाजनिर्मितीच्या दृढ संकल्पासाठी ओळखले जातात. त्यांच्या कर्तृत्वाने भारतीय बौद्ध समाजाला नवी ऊर्जा व नेतृत्व दिले. म्हणून त्यांना बौद्धाचार्याचे जनक म्हणतात.”
याप्रसंगी महासभेच्या सरचिटणीस अभिमन्यू लामतुरे यांनी विविध उपक्रमांची उपक्रमांची घोषणा केली.
यामध्ये, ग्रामीण भागात धम्मजागृती शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र, तरुणांसाठी समता सैनिक शिबिरे व लीडरशिप प्रशिक्षण, बौद्ध साहित्याचे डिजिटलायझेशनचा समावेश असल्याचे जाहीर करुन या उपक्रमात ग्रामीण भागातील उपासक व उपासिकांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.
यानंतर महिला शाखेच्या जिल्हाध्यक्षा शारदाताई हजारे यांनी संविधान समर्थक महिला मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले. त्यातून महिलांचे न्याय, हक्क व अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी या मेळाव्याचा मूळ उद्देश असल्याचे सांगितले.
महासभेचे पदाधिकारी यांनी सांगितले की, हे सर्व उपक्रम भैय्यासाहेबांच्या सामाजिक बांधिलकीच्या ध्येयाशी सुसंगत असून आगामी काळात व्यापक स्तरावर राबवले जातील.
दीपप्रज्वलनंतर “बुद्धं शरणं गच्छामि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भैय्यासाहेब आंबेडकर” या सामूहिक घोषणेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे एकात्मतेचा संदेश घुमला.
अखेरीस धम्म दीक्षा समितीचे राहुल गायकवाड यांनी भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी आजी – माजी पदाधिकाऱ्यांसह ग्रामीण भागातील समाजात अधिक धम्म विषयी जागरुकता, शिक्षण, करुणा आणि समतेचे कार्य अखंडपणे चालू ठेवण्याचा संकल्प केला.
याप्रसंगी मान्यवर सुफी सय्यद सह भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा (प.) च्या जनरल व महिला शाखेचे माजी जिल्हाध्यक्ष हिराचंद गायकवाड, विलास आल्टे, विलास गायकवाड, प्रेमनाथ कांबळे, प्रशांत थोरात, विश्वंभर माने, भैय्यासाहेब कांबळे, अशोक शिंदे, देवराव जोगदंडे, सदानंद कापूरे,प्रा.भाऊराव कांबळे, लक्ष्मण कांबळे, आनंद डोनेराव, डी. पी.भोसले, राजाराम साबळे, वंदनाताई कांबळे, मायाताई कांबळे, ज्ञानेश्वरीताई बटवाड, जोगदंडे ताई, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सरणतय गाथेनी कार्यक्रमाचा समारोप झाला.
