03/06/2026
dalimb

पाच दिवसीय निवासी ध्यान साधना शिबिराचा समारोप उत्साहात

उमरगा : मानवाने स्वतःच्या चित्तशुद्धीसोबत इतरांच्या दुःख निवारणासाठी कार्यरत राहणे हाच खऱ्या सुखाचा मंत्र असल्याचे प्रतिपादन धम्मचारी नागरत्न (छत्तीसगड) यांनी केले. स्वतःमध्ये मैत्रीभाव विकसित करून तोच भाव इतरांप्रती समानतेने जोपासला, तर कोणालाही दुःख होणार नाही. मनातील विकार ओळखून ते नाहीसे करण्यासाठी ध्यान आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
             त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या विद्यमाने शहरातील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात आयोजित पाच दिवसीय निवासी ध्यान साधना व नित्यमूल्य शिबिराच्या समारोपप्रसंगी मंगळवारी ते बोलत होते. यावेळी त्रिरत्न बुद्धिस्ट सेंटरचे चेअरमन धम्मचारी रत्नपालित यांची प्रमुख उपस्थिती होती.शिबिरात “नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स” या विषयावर दररोज अभ्यासपूर्ण धम्मदेशना आयोजित करण्यात आली. धम्मचारी नागरत्न यांनी आपल्या प्रभावी व विद्वत्तापूर्ण वाणीमधून धम्मपदातील बुद्धवचने तसेच बौद्ध साहित्य आणि पालि संदर्भांच्या माध्यमातून शिबिरार्थींच्या मनात जागृतीचा दीप प्रज्वलित केला.
             “भगवतो, अरहतो, सम्मासम्बुद्धस्स” या संज्ञांचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, तथागतांनी महाप्रज्ञा, महामैत्री, महाकरुणा, महामुदिता आणि महाउपेक्षा अशा गुणांचा विकास करून स्वतःतील दोष पूर्णतः नष्ट केले आणि परिपूर्ण, परिशुद्ध सम्यक सम्बुद्धत्व प्राप्त केले.
              पुढे बोलताना त्यांनी नियमित धम्मश्रवण, शीलाचरण आणि समाधीमार्गाचे आचरण करून बुद्धगुणांचा विकास केल्यास प्रत्येक व्यक्ती शाश्वत सुख प्राप्त करू शकते, असे सांगितले. कुटुंब, समाज, देश आणि जगाला सुखाकडे नेणारा तथागतांचा हा सनातन मार्ग असून या धम्मपथावर कटिबद्धपणे चालल्यास जीवन सुखी होईल, असा संदेश त्यांनी दिला.
पाच दिवसांच्या निवासी शिबिरात ध्यान, चंक्रमण, पूजा, गटचर्चा आणि समूहकार्याचे आयोजन करण्यात आले होते.

             शीलाचरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी दररोज रात्री “पंचशील” या विषयावर धम्मचारी रत्नपालित, धम्मचारी विबोध आणि धम्मचारी धम्मभूषण यांनी प्रभावी प्रवचने दिली. तसेच धम्मचारी प्रज्ञाजीत यांनी सकाळच्या ध्यान व चंक्रमण साधनेचे नेतृत्व केले. या शिबिरात एकूण ४० शिबिरार्थींनी सहभाग नोंदविला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी धम्ममित्र उत्तम गायकवाड, धम्ममित्र मारुती कांबळे, धम्ममित्र अजय गायकवाड, धम्ममित्र जी. एल. कांबळे, धम्ममित्र प्रियदर्शी कांबळे, धम्ममित्र प्रीती मनोहर, धम्ममित्र मंदा टिळे, धम्ममित्र संघप्रिया कांबळे आणि धम्ममित्र राजन जाधव यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. www.samtapatra.online Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!