03/06/2026
Dalimb

‘मी रमाई बोलतेय’ नाटिकेतून माता रमाईंच्या त्यागाला अभिवादन
उमरगा, (वा.) : त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त डॉ. वैभवी घारगावकर प्रस्तुत ‘मी रमाई बोलतेय’ या हृदयस्पर्शी नाटिकेचे सादरीकरण बुधवारी रात्री शहरातील नगरपालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आले. या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत माता रमाई यांच्या संघर्षमय जीवनाला अभिवादन केले.
                         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंतकुमार कांबळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, नगरसेवक बाबा मस्के, अश्विनीताई सोनकांबळे, दि लॉर्ड बुद्धा ट्रस्टचे उपाध्यक्ष मच्छिंद्र सरपे, वंचित बहुजन आघाडीचे रामभाऊ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
                         डॉ. वैभवी घारगावकर यांनी नाट्यछटेतून माता रमाई यांच्या जीवनातील संघर्ष, त्याग, कुटुंबातील अडचणी, लहान मुलांचे आजारपण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षण घेण्याची जिद्द आणि रमाई यांनी दिलेली खंबीर साथ प्रभावीपणे उभी केली. विशेषतः बाबासाहेब विदेशात शिक्षणासाठी असताना औषधोपचाराअभावी मुलांचे निधन झाल्याची वेदनादायी घटना रमाई पत्रातून कथन करत असल्याचा प्रसंग सादर करण्यात आला. या प्रसंगाने उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले.    कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनावर आयोजित निबंध स्पर्धेतील सहभागी स्पर्धक तसेच संविधान गुणगौरव परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
                        कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष सुरवसे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप कांबळे व राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले, तर प्रा. संजय कांबळे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश भालेराव, किरण कांबळे, बाळासाहेब भोसले, सतिश ढोणे, जीवन सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. www.samtapatra.online Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!