ज्येष्ठ पौर्णिमेचे महत्त्व आणि आधुनिक बौद्ध समाजाचे कर्तव्य
भारतीय संस्कृतीमध्ये पौर्णिमेला विशेष धार्मिक, अध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. बौद्ध परंपरेत तर प्रत्येक पौर्णिमा ही स्वपरीक्षण, सदाचार, करुणा आणि धम्माचरणाची प्रेरणा देणारी मानली जाते. वैशाख पौर्णिमा जशी भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाणामुळे पवित्र मानली जाते, त्याचप्रमाणे ज्येष्ठ पौर्णिमेलाही महत्त्वपूर्ण स्थान आहे. ही पौर्णिमा केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित नसून समाजात नैतिक जीवन, शांती, संयम आणि मानवतावादी विचार रुजविणारी आहे.
पालि त्रिपिटक आणि विविध बौद्ध ग्रंथांमध्ये उपोसथ, पौर्णिमा आणि धम्मसभांचा उल्लेख वारंवार आढळतो. प्राचीन काळात भिक्खू संघ पौर्णिमेच्या दिवशी एकत्र येऊन विनय नियमांचे पठण करत असे. गृहस्थ उपासक-उपासिका अष्टशील पाळून धम्मश्रवण करत असत. त्यामुळे पौर्णिमा ही केवळ पूजा-अर्चेचा दिवस नसून स्वशुद्धीचा दिवस मानला जात असे. ज्येष्ठ पौर्णिमेला बुद्धकाळापासून घडलेल्या कांही महत्वाच्या घटना पण आपण जाणून घेतल्या पाहिजेत. तपस्सू आणि भल्लिक हे तत्कालीन उत्कल प्रदेशातील (आजचा ओरिसासह म्यानमार देश) दोन व्यापारी बंधू होते. ते सुमारे ५०० गाडीवानांसह व्यापारासाठी प्रवास करत होते. त्या काळात तथागतांनी बोधगया येथे संबोधी प्राप्त झाल्यानंतर विमुक्ती सुखाचा आनंद घेत होते. विविध वृक्षांखाली ध्यान व चिंतनात त्यांनी चार आठवडे पूर्ण केले होते. चार आठवड्यानंतर ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी हे व्यापारी उरुवेला परिसरातून जात असताना त्यांनी एका तेजस्वी, शांत आणि विलक्षण व्यक्तिमत्त्व असलेल्या तथागतांना पाहिले. बुद्धांच्या अंगातून तेजोमय प्रसन्नता व करुणा प्रकट होत होती. व्यापाऱ्यांना त्यांच्या विषयी अपार श्रद्धा निर्माण झाली. त्यांनी बुद्धांना मधुपिंड (मधाचे लाडू) व मठ्ठा अर्पण केला. संबोधीनंतर बुद्धांनी स्वीकारलेले हे पहिले भोजन मानले जाते. भोजन अर्पण केल्यानंतर तपस्सू आणि भल्लिक यांनी बुद्धांकडून धम्म ऐकला आणि ते बुद्ध व धम्म यांना शरण गेले. म्हणून त्यांनी “बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि” अशी द्विशरणे ग्रहण केली. कारण त्यावेळी अजून संघाची स्थापना झाली नव्हती. म्हणून द्विशरणे ग्रहण केली. त्यामुळे ते जगातील पहिले गृहस्थ उपासक ठरले. त्यांनी बुद्धांना आपली आठवण राहण्यासाठी कांही तरी द्यावे अशी विनंती केली. बुद्धांनी त्यांना आपल्या केशधातूंचे स्मृतिचिन्ह दिले. पुढे त्यांनी त्या धातूंवर मोठा स्तूप उभारून बुद्धधम्माचा प्रसार केला. आजही तो स्तूप म्यानमार या देशात उभा आहे. या घटनेमुळे बौद्ध धम्म हा केवळ भिक्षूंसाठी नसून सामान्य गृहस्थांसाठीही आचरणीय आहे, हा संदेश आपणास मिळतो.
सुजाता ही उरुवेला गावातील सेनानी नामक श्रीमंत व्यक्तीची कन्या होती. तिने एका वडाच्या वृक्षाजवळ मनोमन नवस केला होता की, “मला योग्य पती आणि पुत्रप्राप्ती झाली तर मी वृक्ष देवतेला खीर अर्पण करीन.” तिची इच्छा पूर्ण झाल्यानंतर कांही काळाने तिने वडाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसलेल्या सिद्धार्थ गौतमांना खीर अर्पण केली. त्यावेळी सिद्धार्थ गौतमानी मी वनदेवता नसून महामाया व राजा शुद्धोधन यांचा मुलगा आहे. दुःख मुक्तीच्या मार्गाच्या शोधात असल्याचे गौतमानी सांगितले. सुजाताकडून खीर स्वीकारल्यानंतर सिद्धार्थांनी अति कठोर तपश्चर्या सोडून मध्यम मार्ग स्वीकारला आणि त्यांना संबोधी प्राप्त झाली. यानंतर ज्येष्ठ पौर्णिमेच्या काळात बुद्धांनी पुन्हा सुजाताची भेट घेतली. कारण सुजातानी बुद्धत्व प्राप्तीनंतर आपण माझी भेट घ्यावी अशी विनंती केली होती. त्यामुळे तथागतांनी ज्ञानप्राप्तीनंतर तिची भेट घेतली आणि तिला धम्म उपदेश केला. बुद्धांच्या उपदेशाने सुजातेला धम्माची जाणीव झाली. तिने बुद्ध, धम्म आणि संघ यांच्याविषयी श्रद्धा स्वीकारून उपासिका म्हणून जीवन जगण्याचा संकल्प केला. सुजाता ही बौद्ध इतिहासातील पहिल्या स्त्री उपासिकांपैकी एक मानली जाते. तिच्या जीवनातून आपण पुढील संदेश घ्यावा, असे मला वाटते. दानाचे महत्त्व, मध्यम मार्ग, स्त्रियांचे धम्मातील स्थान, श्रद्धा व प्रज्ञेचे एकत्रित मूल्य, सुजातेच्या खिरीदानामुळे बुद्धत्व प्राप्तीचा मार्ग दृढ झाला आणि तिच्या उपासिका होण्यामुळे स्त्रियांसाठी धम्माचे दार अधिक व्यापक झाले.
चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी कलिंग युद्धानंतर बुद्धधम्म स्वीकारला आणि संपूर्ण भारतात धम्मप्रसार सुरू केला. त्यांनी तिसरी धम्मसंगीती आयोजित करून धम्मप्रसारासाठी विविध देशात भिक्षू पाठवले. त्यांचा पुत्र महेंद्र हे विद्वान भिक्षू होते. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी ते आपल्या सहकाऱ्यासह श्रीलंकेस धम्मप्रसारासाठी रवाना झाले.
त्याकाळी श्रीलंकेचा राजा देवानंपिय तिस्स होता. हा राजा सम्राट अशोक यांचा मित्र होता. भन्ते महेंद्र थेट मिसाका पर्वतावर (आजचे मिहिंतले) पोहोचले. तेथे राजाची भेट झाली. भन्ते महेंद्रांनी राजाला धम्मोपदेश केला. राजाला धम्म समजला आणि त्याने बुद्धधम्म स्वीकारला. यानंतरच्या कालावधीत श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावर बौद्ध धम्माचा प्रसार झाला. पुढे राजा अशोकांची कन्या संघमित्रा हिने बोधीवृक्षाची फांदी श्रीलंकेत घेऊन गेली. अनुराधापूर येथे त्या बोधीवृक्षाची स्थापना झाली. भारताबाहेर बुद्धधम्माचा प्रभावी प्रसार, श्रीलंकेत थेरवाद परंपरेची स्थापना, पालि साहित्याचे संवर्धन, बौद्ध संस्कृतीचा जागतिक विस्तार. आजही श्रीलंका हा प्रमुख बौद्ध देश म्हणून ओळखला जातो, त्याची पायाभरणी भन्ते महेंद्र यांच्या धम्म कार्यातून झाली. ज्येष्ठ पौर्णिमा ही केवळ धार्मिक उत्सव नसून बौद्ध धम्माच्या इतिहासातील परिवर्तनकारी घटनांची स्मृती आहे.
तपस्सू व भल्लिक यांनी प्रथम उपासक होऊन गृहस्थ धम्माची सुरुवात केली. सुजाताने दान, श्रद्धा आणि स्त्री सहभागाचे आदर्श निर्माण केले. भन्ते महेंद्र यांनी धम्माचा जागतिक प्रसार करून बुद्धांचा संदेश सीमापार पोहोचवला. या घटनांमधून करुणा, दान, प्रज्ञा, समता आणि धम्मप्रसार यांचे महान मूल्य आपल्या जीवनात अंगीकारण्याची प्रेरणा मिळते. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही उष्णतेच्या काळात मनाला शांती देणारी आणि संयम शिकवणारी मानली जाते. बुद्धांनी “मध्यम मार्ग” सांगितला. अति भोग आणि अति क्लेश या दोन्ही टोकांपासून दूर राहून संतुलित जीवन जगण्याचा संदेश दिला. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात हा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. आज समाजात वाढती हिंसा, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, द्वेष, कौटुंबिक कलह आणि मानसिक अस्थिरता दिसून येते. अशा वेळी बौद्ध समाजाने पौर्णिमेचे खरे महत्त्व समजून घेतले पाहिजे. फक्त विहारात जाऊन अगरबत्ती लावणे किंवा औपचारिक कार्यक्रम करणे एवढ्यावर पौर्णिमा संपत नाही. तिच्या माध्यमातून जीवन परिवर्तनाचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे.
बौद्धांनी या दिवशी पुढील आचरण अंगीकारणे गरजेचे वाटते. पंचशील आणि अष्टशीलाचे पालन करणे. माता-पित्यांचा आदर करणे. व्यसनमुक्त जीवन जगणे. करुणा, मैत्री आणि समतेचा विचार आचरणात आणणे. मुलांना धम्म शिक्षण देणे. समाजातील गरजूंना मदत करणे. पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता अभियानात सहभागी होणे. भिक्खू संघाकडून धम्मश्रवण करून जीवनात सदाचार वाढवणे गरजेचे आहे.
बुद्धकालीन समाजात साधेपणा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि परस्पर सन्मान यांना महत्त्व होते. आज आधुनिकतेच्या नावाखाली भौतिक सुखांची स्पर्धा वाढली आहे; पण यातून मानसिक समाधान हरवत चालले आहे. म्हणूनच बौद्धांनी बुद्धांच्या शिकवणुकीकडे पुन्हा वळणे आवश्यक आहे. भगवान बुद्धांनी सांगितले आहे. अत्त दिपो भव ” स्वतःच स्वतःचा दीप बना. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीने विवेक, प्रज्ञा आणि नैतिकता यांच्या आधारे जीवन जगावे. समाजातील परिवर्तन हे स्वतःपासून सुरू झाले पाहिजे. पौर्णिमेच्या दिवशी ध्यान, मैत्रीभावना, धम्मचर्चा आणि सामाजिक सेवा यांचा कार्यक्रम घेतल्यास समाज अधिक सुसंस्कृत होईल. आज प्रत्येक माणूस सुख शोधत आहे; परंतु बाह्य सुखामागे धावताना अंतःकरणातील शांती हरवत आहे. बुद्ध धम्म आपल्याला सांगतो की खरे सुख हे लोभ, द्वेष आणि मोह कमी करण्यात आहे. ज्येष्ठ पौर्णिमा ही स्वपरीक्षण करून नवे जीवन सुरू करण्याची सुवर्णसंधी आहे. जर प्रत्येक बौद्धाने सत्य बोलले, अहिंसा पाळली, व्यसनांपासून दूर राहिले, शिक्षणाला प्राधान्य दिले, स्त्री-पुरुष समानतेचा स्वीकार केला आणि मानवतेचा विचार जोपासला, तर कुटुंब, समाज आणि राष्ट्र अधिक शांततामय व प्रगत होईल.
ज्येष्ठ पौर्णिमा ही केवळ धार्मिक परंपरा नसून धम्म, नैतिकता आणि सामाजिक प्रबोधनाचा दिवस आहे. ही शिकवण समजून घेऊन वर्तमान काळातील बौद्धांनी बुद्धकालीन सदाचार स्वीकारला पाहिजे. पौर्णिमेचा दिवस हा स्वपरीक्षण, धम्माचरण आणि समाजहितासाठी समर्पित केला, तर वर्तमान जीवन निश्चितच सुखी, समाधानी आणि प्रकाशमय बनेल.
“बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हा बुद्धांचा संदेशच आजच्या मानवजातीसाठी खरा मार्गदर्शक ठरू शकतो.
राहुल गायकवाड, लातूर
मोबा. 9595751373
