03/06/2026
10 (1)

तुगाव येथील बौद्ध तरुणावर हल्ला; आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी उमरग्यात रास्ता रोको आंदोलन
उमरगा, (वा.) : तालुक्यातील तुगाव येथील बौद्ध तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (दि. २९) दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंबेडकरी अनुयायांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
             याबाबत उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. १८ मे रोजी तुगाव येथील भालचंद्र चोखोबा कांबळे या बौद्ध तरुणाला काही जणांनी बोलावून घेतले. “गावात दोन जयंत्या का करता?” असा जातीय द्वेषातून प्रश्न उपस्थित करत पंकज जोमदे, रोहित जोमदे, महेश जोमदे आणि चांद फकीर यांनी संगनमत करून रोहित जोमदे यांच्या शेतातील द्राक्षबागेत नेले. तेथे लोखंडी पोलला हात-पाय बांधून भालचंद्र कांबळे यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १९) तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यास चालढकल केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी निवेदनात केला आहे. आरोपी खुलेआम गावात फिरत असून पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.

  तसेच आरोपींचे नातेवाईक रात्री उशिरा फिर्यादीच्या घरी जाऊन धमकावत असल्याने भालचंद्र कांबळे यांच्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला.
या आंदोलनात रिपब्लिकन पार्टीचे तुळजापूर तालुकाध्यक्ष अरुण लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब मस्के, हरिष डावरे, एस. के. चेले, बाबासाहेब गायकवाड, संजय कांबळे, धीरज बेळंबकर, दगडू भोसले, यशवंत भंडारे, प्रतीक सूर्यवंशी, रिपाइंच्या महिला अध्यक्षा आशा कांबळे, सुमन गायकवाड आदी सहभागी झाले होते.
             प्रारंभी तहसीलदार निवेदन स्वीकारण्यासाठी घटनास्थळी येत नसल्याने आंदोलकांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पवित्रा घेतला. पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी निवेदन स्वीकारून आंदोलन मागे घेण्याची विनंती करत रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक तहसीलदार येण्याच्या मागणीवर ठाम राहिले.
अखेर तहसीलदार गोविंद येरमे यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारल्यानंतर वातावरण शांत झाले आणि आंदोलन मागे घेण्यात आले.
             यावेळी तुगाव येथील नीलकंठ कांबळे, भालचंद्र लोखंडे, सुदर्शन कांबळे, नागसेन कांबळे, शाहूंराज भोसले, विद्याचंद्र कांबळे, कमळाबाई कांबळे, पंचशीला कांबळे, मंदाकिनी भोसले, छबूबाई सुरवसे, कल्पना गायकवाड, मंगलबाई गवळी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. www.samtapatra.online Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!