विद्यार्थ्यांनी वकिलीक्षेत्राबरोबरच न्यायदानाच्या क्षेत्रात यावे – न्यायमूर्ती मंगेश पाटील.
दयानंद विधी महाविद्यालय, लातूर येथे २९ नोव्हेंबर २०२५ रोजी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मंगेश एस. पाटील, अध्यक्ष—महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई—यांच्या प्रमुख उपस्थितीत संवादात्मक सत्राचे आयोजन करण्यात आले होते. न्यायाधीश म्हणून काम करताना शिस्त आणि प्रामाणिकता हे अत्यंत महत्त्वाचे गुण आहेत असे त्यांनी सांगितले. तरुण विद्यार्थ्याना वकिली क्षेत्राबरोबरच न्यायपालिकेमध्ये न्यायाधीश म्हणून कार्य करण्यासाठी खूप संधी आहे असे मत त्यांनी मांडले. ते पुढे म्हणाले की प्रत्येक काम केवळ मन लावून नव्हे, तर आनंदाने केले पाहिजे.न्यायालयातील प्रलंबित खटल्यांवर देखील त्यांनी अत्यंत वास्तववादी मत मांडले, खटल्यांची संख्या वाढणे हे समाजातील वाढती लोकसंख्या आणि त्याच्यामुळे होणारी गुंतागुंत याचा परिणाम आहेत. प्रत्येक प्रकरणाला २–३ वर्षांचा नैसर्गिक वेळ लागतो, त्यामुळे या वास्तवाची जाण ठेवूनच प्रलंबन मोजले पाहिजे. न्यायाधीश आणि वकील या दोघांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास प्रलंबन कमी करण्यास मोठी मदत होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.आशिषजी बाजपाई व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ पूनम नाथानी उपस्थित होते.
न्यायमूर्ती पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यावसायिक सल्ले देखील दिले ते म्हणाले की कायद्याचा अभ्यास करताना फक्त पाठांतर न करता त्यामागील व्यवहारातील अर्थ समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. वकिलीच्या सुरुवातीची काही वर्षे आर्थिकदृष्ट्या कठीण जाऊ शकतात, पण हाच काळ सर्वात महत्त्वाचा असतो या काळात जितके निरीक्षण, वाचन, कोर्टातील वास्तविक व्यवहार समजून घेतला जाईल तितके भविष्यातील करिअर भक्कम होते. चांगली, स्वच्छ आणि संयमित भाषा ही वकिलाचे मोठे सामर्थ्य आहे, हे त्यांनी विशेष अधोरेखित केले. मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी एखादा छंद ठेवणे गरजेचे आहे असे देखील ते म्हणाले. विद्यार्थ्यांना वाचण्याची प्रेरणा देत भाषेचे सौंदर्य, तर्कशक्ती आणि न्यायलेखनाची शैली यांचा अभ्यास करावा, असे त्यांनी आवाहन केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदवली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.अतिश तिवारी यांनी तर आभारप्रदर्शन प्रा ओमप्रकाश जाधव यांनी केले.
