मनपा मालकीच्या व बी ओ टी गाळेधारकांना व्याजात १००% सूट
लातूर(६),प्रतिनिधी : लातूर शहर महानगरपालिका मालकीच्या गाळे व बी ओ टी गाळ्यांचे भाडे मोठ्या प्रमाणात थकीत असून, हि थकबाकी कमी होऊन अधिकाधिक भाडे वसुली व्हावी तसेच थकबाकी असलेल्या गाळेधारकांना भाडे भरण्यास प्रोत्साहित करण्याच्या हेतूने लातूर शहर महानगरपालिका मार्फत दि. ०८.१२.२०२५ ते दि. ३१.१२.२०२५ पर्यंत मनपा मालकीच्या व बी ओ टी तत्वा वरील गाळेधारकांना व्याजामध्ये १००% सुट जाहीर करण्यात आली आहे.
मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांच्या आदेशान्वये व उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांच्या नियोजनात ही व्याजसुट योजना राबविली जाणार असून गाळेधारकांनी व्याजसुटीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने गाळेधारकांना केले आहे.
विविध गाळे धारकांच्या व्याजमाफी संदर्भात मागणीला सकारात्मक प्रतिसाद म्हणून व्याजसुट देण्याचा निर्णय मनपा आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी यांनी घेतला आहे. तरी या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन ज्या गाळे धारकांकडे थकबाकी आहे अशा गाळेधारकांनी तात्काळ एकरकमी थकबाकीचा भरणा करुन मनपास सहकार्य करावे व होणारी कटू कार्यवाही टाळावी असे आवाहन उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी केले आहे.
