लातूर शहर महानगरपालिका निवडणूक : शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी
लातूर(३०), प्रतिनिधी —लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने निवडणूक कार्यालयात उमेदवार व समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी धाव घेतली होती.
अंतिम दिवस असल्यामुळे अर्ज दाखल करताना मोठी लगबग दिसून आली. अनेक उमेदवारांनी समर्थकांच्या घोषणाबाजीसह आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. त्यामुळे निवडणूक कार्यालय परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक अधिकारी सतर्क होते.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत प्रमुख पक्षांसह अनेक अपक्ष उमेदवारही मैदानात उतरल्याने निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. अर्ज छाननीनंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार असून, त्यानंतर निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल.
