17/03/2026
latur-zp-ceo-a_2025021400508

वाढली थंडी, घ्या तब्बेतीची काळजी..!

राज्यात सध्या दिवसेंदिवस तापमानाचा पारा चांगलाच खाली येताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात सर्वदूर थंडी वाढल्याचे चित्र आहे. उत्तरेकडे थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने राज्यात कडाक्याची थंडी पडली असून लातूर जिल्ह्यात देखील कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत आहे. उत्तरेकडील वाढत्या शीत लहरींमुळे राज्यात पुढील काही दिवस कडाक्याची थंडी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 

दरम्यान, थंडीची लाट किंवा शीत लहर ही एक हवामानीय घटना आहे, ज्यामुळे विशिष्ट क्षेत्रातील तापमान सरासरीपेक्षा खूप कमी होते. थंडीच्या लाटेमुळे उच्च वेगाच्या थंड वाऱ्यांचा अनुभव येतो, ज्यामुळे हवामान प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा जास्त थंड वाटते. ही घटना अचानक घडू शकते किंवा काही दिवसांपर्यंत टिकू शकते, ज्यामुळे मानवी जीवन, शेती, पशुधन, वन्यजीव प्रभावित होण्याची शक्यता असते.

 

वाढत्या शीत लहरीमुळे शरीराच्या तापमानावर विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे शारीरिक समस्या उद्भवू शकतात विशेषतः आरोग्याच्या दृष्टीने अति जोखीम घटक जसे की, गरोदर महिला, लहान बालके, वयोवृद्ध नागरिक, श्वसनाच्या आजारांच्या व्यक्ती हे अधिक प्रभावित होण्याची शक्यता असते.

 

या अनुषंगाने, जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना त्यांच्या संबंधीत कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे बाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या असून वाढत्या थंडीपासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी, सुरक्षित रहाण्यासाठी पुढील प्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे.

 

वाढत्या थंडीत – घ्यावयाची काळजी

 

· पुरेसे थंडीचे कपडे बाळगा, एकावर एक असे अनेक कपडे घालणेही उपयुक्त.

 

· कोरडे राहा, ओले असाल तर कपडे पटकन बदला ज्याद्वारे शरीरातील उष्णता कमी होणार नाही.

 

· हातमोज्यांपेक्षा पूर्ण हात सलगपणे झाकला जाईल असे मोजे घ्या, त्यानं जास्ती गरम वाटून थंडीपासून बचाव होतो.

 

· लाट आली असताना शक्यतो घरातच थांबा, थंड वाऱ्यापासून बचावासाठी किमान प्रवास करा.

 

· घरातल्या वृद्धांची आणि लहान मुलाची काळजी घ्या.

 

· रेडीओ, टीव्ही तसंच वृत्तपत्रातून हवामानविषयक ताज्या बातम्या मिळवा.

 

· नियमितपणे गरम पेय प्या.

 

· मद्यपान करू नका, त्यानं शरीराचं तापमान कमी होतं.

 

· थंडीने शरीराचा भाग मऊ वा मलूल होणं, बोटांवर तसेच पायाच्या टोकाला, कानाच्या पाळीला आणि नाकाच्या शेंड्यावर निस्तेजपणा, पांढरटपणा किंवा पिवळेपणा जाणवणे यासारख्या लक्षणांकडे लक्ष द्या.

 

· थंडीचा चटका बसून भाजल्यासारखं झालं तर चोळू नका, त्यानं जास्तीच हानी होईल.

 

· थंडीचा चटका बसलेला शरीराचा भाग गरम पाण्यात म्हणजे सहन होईल इतपत गरम पाण्यात बुडवावा.

 

· थंडीनं कापत असाल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे शरीराचे तापमान कमी होत असल्याचे पहिले लक्षण आहे आणि लगेचच घरात या.

 

· थेट शरीराशी संपर्क होईल अशा पद्धतीने थंडी कमी करा, त्यात घोंगड्याचा थर, कपडे, टॉवेल किंवा काहीही आच्छादनाचा थर वापरा.

 

· थंडीमुळे कोणताही प्रकारची आरोग्य समस्या उद्भवल्यास नजीकच्या शासकीय दवाखान्यात जाऊन तपासणी करा.

 

अशा प्रकारे, वाढत्या थंडीत जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी, सुरक्षित रहाण्यासाठी उपरोक्त प्रमाणे आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरुरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. www.samtapatra.online Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!