निवडणूकीच्या अनुषंगाने मनपा अॅक्शन मोडवर,स्टॉंग रुमसह विविध ठिकाणी आयुक्तांनी केली पाहणी
लातूर(१०), प्रतिनिधी: आगामी काही दिवसात होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय,मतमोजणी, तसेच स्ट्रॉंग रूमसाठी जागा आवश्यक आहे. त्याअनुषंगाने मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी बुधवारी (दि. १०) स्थळ पाहणी केली.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासन तयारी करत आहे. मतदानानंतर मतमोजणी पर्यंत काही दिवस मतपेट्या संरक्षित ठिकाणी ठेवाव्या लागतात.तसेच त्यानंतर मतमोजणीसाठीही सुरक्षित स्थळ आवश्यक असते. त्याअनुषंगाने आयुक्तांनी पाहणी करून चाचपणी केली.
मतमोजणी व स्ट्रॉंग रूमसाठी बार्शी रस्त्यावरील महिला तंत्रनिकेतन तसेच औसा रस्त्यावरील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारतींची पाहणी आयुक्तांनी केली. मतमोजणीसाठी आवश्यक असणा-या बाबी/ सोयी-सुविधाची पाहणी केली. या ठिकाणी अधिकच्या कोणत्या सोयी कराव्या लागतील याची माहितीही आयुक्तांनी घेतली.
निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र कार्यालय आवश्यक आहे. त्यासाठी बार्शी रस्त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय तसेच बाजार समिती परिसरातील समाज कल्याण कार्यालय या ठिकाणांची पाहणीही आयुक्त श्रीमती मानसी यांनी केली.
याप्रसंगी मनपा उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे,शहर अभियंता उषा काकडे, कार्यकारी अभियंता विजय चव्हाण, अग्निशमन अधिकारी गणेश चौधरी, प्रवीण इंगळे,निवडणूक विभाग प्रमुख परमेश्वर होके यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
