महापरिनिर्वाण दिन – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने विनम्र अभिवादन !
लातूर (दि.६), प्रतिनिधी —
जगातील महान सामाजिक क्रांतीचे शिल्पकार, भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार आणि मानवमुक्तीचे प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज लातूरमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमांतून बाबासाहेबांच्या कार्याचा जागरूक स्मरणोत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर येथून असंख्य अनुयायांसह मान्यवरांनी पुष्पमाला अर्पण करून डॉ. आंबेडकरांच्या कार्यतत्परतेला आणि त्यांच्या सामाजिक समतेच्या संदेशाला आदरांजली वाहिली. भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने आयोजित सभेत संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय, बंधुता, स्त्री-पुरुष समानता आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचा गौरवपूर्वक आढावा घेण्यात आला. मान्यवरांनी आपल्या भाषणांतून भारताच्या बदलत्या सामाजिक वास्तवात बाबासाहेबांचे विचार अधिक प्रभावी आणि गरज गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच
“आजच्या नव्या पिढीने शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या बाबासाहेबांच्या विचारांचा अंगीकार करून समाजातील विषमता आणि अज्ञानाचा अंधार दूर करावा,” असा संदेश दिला. संविधानिक हक्कांचे रक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावादी मूल्यांचे संवर्धन आणि सामाजिक एकोपा यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष हिराचंद गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी सामाजिक न्याय, समानता आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याचा संकल्प व्यक्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लातूरमध्ये व्यक्त झालेल्या अभिवादनांमधून त्यांच्या कार्याचा अमर वारसा आणि जनतेतील अभेद्य विश्वास पुन्हा अधोरेखित झाला.
याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे माजी सरचिटणीस अशोक शिंदे, धम्म दीक्षा समिती जिल्हा प्रमुख राहुल गायकवाड, उपप्रमुख सदानंद कापूरे, बौद्धाचार्य ज्ञानोबा इंगळे गुरुजी, विलास आल्टे, प्रेमनाथ कांबळे सर, संजय गायकवाड, विश्वंभर माने, प्रा.भाऊराव कांबळे सर, देवदत्त बनसोडे, राजाभाऊ उबाळे, हणमंत कांबळे, लक्ष्मण कांबळे, सिद्धांत चिकटे, डी.पी.भोसले, प्रसेनजीत जोगदंड, भीमराव करवंजे, सुधाताई सोनवणे, सपनाताई देडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
