सुकेसिनीची कथा
श्रावस्ती नगरामध्ये सुकेसिनी नावाची एक गरीब मुलगी झोपडीत राहत होती. अत्यंत गरीब होती. परंतु तिच्याकडे एक श्रीमंती होती ती म्हणजे तिचे केस.
तिचे केस खूप लांब होते. रेशमी होते त्यामुळे श्रावस्तीमध्ये ती केसांमुळे खूप परिचित होती. सर्व स्त्रियांना तिचा हेवा वाटायचा. प्रत्येक घराघरा तिच्या केसांची चर्चा चालत असे.
श्रावस्ती मध्ये एक राजा होता . त्याची एक सुंदर राणी होती ती दिसायला खूप सुंदर होती परंतु तिचे केस सुकेसिनीच्या केसासारखे नव्हते.
एक दिवस राजमहालात राजा आणि राणी बसलेले असताना त्यांच्या गप्पागोष्टी रंगल्या. राजाने राणी समोर सुकेसिनीच्या केसांची स्तुती केली. ती गोष्ट राणीच्या मनाला खूप दुःख देऊन गेली.
राणीच्या अंगावर भरपूर असे दागिने होते ,अलंकार होते . भरजरी कपडे होते . परंतु तिचे केस लांब नव्हते. त्या गोष्टीचे दुःख तिला फार झाले. आणि सुकेसिनीच्या विषयी तिच्या मनात द्वेष उत्पन्न झाला .
कारण माणसाला दुसऱ्याचे सुख पाहणे आवडत नाही. अशा माणसाला रोगी माणूस म्हणतात. परंतु जो माणूस दुसऱ्याचे सुख पाहून आनंदीत होतो त्याला निरोगी माणुस म्हणतात. कारण दुसऱ्याचे दुःख पाहून आनंदी होणारी माणसे या जगात जास्त आहे.
तथागत बुद्ध म्हणतात.” लोक स्वतःच्या दुःखाने दुःखी तर आहेतच. परंतु स्वतःच्या दुःखापेक्षा इतरांचे सुख पाहून जास्त दुःखी होतात.,”
राजाचे बोलणे राणीला खूप दुःख करून गेले. सर्व सुख संपत्ती असताना देखील आपले केस लांब नाहीत म्हणून ती खूप दुःखी झाली आणि ती सुकेसिनीचा द्वेष करू लागली.
तथागत बुद्ध आणि त्यांचा भिक्खू संघ श्रावस्तीमध्ये चारीका करीत असे .परंतु सुकेसिनीच्या घरी मात्र तथागत बुद्ध किंवा भिक्खू संघ एक वेळच्या भोजनासाठी कधीच आले नव्हते कारण तिची परिस्थिती तशी नव्हती याचे दुःख सुकेसिनीला वाटत होते.
परंतु राजाच्या राणीला मात्र आपले केस लांब नाहीत त्याचे दुःख वाटत होते. हा या दोघींच्या दुःखातील फरक आहे.
एक दिवस राणीच्या मनात एक गोष्ट आली. आपण सुकेसिनीला सुवर्ण मुद्रा द्याव्यात आणि त्या बदल्यात तिचे केस मागावे. तिने आपल्या दासीला बोलावले तिच्याकडे काही सुवर्णमुद्रा दिल्या आणि सांगितले तु या सुवर्ण मुद्रा सुकेसिनीला दे आणि त्याबद्दल तिची केस मागितले असे सांग.
दासी सुकेसिनीच्या घरी आली आणि राणीने सोन्याच्या मुद्रा पाठवलेल्या आहेत त्या घे आणि त्या बदल्यात तुझे केस कापून दे. असे सुकेसिनीला सांगितले.
सुकेसिनी त्या दासीला म्हणते. मी माझे केस विकणार नाही. कारण केस हा स्त्रियांचा सुंदर असा दागिना आहे. पहिल्या दिवशी दासी परत जाते.
दुसऱ्या दिवशी दासी परत सुकेसिनी कडे सुवर्ण मुद्रा घेऊन जाते. या वेळी देखील सुकेसिनी तिला नकार देते. दासी परत राजवाड्यात जाते.
तिसऱ्या दिवशी देखील दासी सुवर्णमुद्रा घेऊन सुकेसिनीच्या घरी जाते. तिसऱ्या दिवशी देखील सुकेसिनी केस देण्यास नकार देते.
त्या दिवशी मात्र दासीला परत पाठवल्यानंतर सुकेसिनी विचार करते. आपण तथागत बुद्धांना आणि त्यांच्या भिक्खू संघाला एक वेळचे भोजन देऊ शकत नाही. या गोष्टीचे तिला खूप दुःख होते . आणि ती ठरवते आपण आपले केस दान करून तथागत बुद्धांना आणि भिकू संघाला भोजनदान करावे. असे पक्के मनात ठरवते.चौथ्या दिवशी उठल्यानंतर ती आपले केस कापते आणि एका ताटामध्ये ठेवते. आणि थोड्याच वेळात दासी परत सुवर्ण मुद्रा घेऊन सुकेसिनीकडे येते.
सुकेसिनी आपले कापलेले केस दासीला देते आणि सुवर्ण मुद्रा घेते. दासी ते केस घेऊन निघून जाते.
सुकेसिनी दुकानावर जाते आणि तथागत बुद्ध आणि त्यांच्या पाचशे भिक्खू लोकांना भोजनासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू विकत घेते .त्यांच्या भोजनाची व्यवस्था करते आणि तथागत बुद्ध आणि भिक्खू संघाला भोजनासाठी आमंत्रित करते.
तथागत बुद्ध आणि भिक्खू संघ आल्यावर मोठ्या श्रद्धायुक्त चित्ताने बुद्धांचे आणि भिक्खू संघाचे आदरा तिथ्य करते आणि त्यांना भोजनदान देते.
आपल्या मनाशी म्हणते. आज माझ्या मनाची इच्छा पूर्ण झाली तथागत बुद्ध आणि भिक्खू संघाला भोजनदान दिले .त्यामुळे ती खूप आनंदित होती. तिला अत्यानंद झाला होता.
राणीची दासी केस घेऊन गेल्यानंतर ते पाहून राणीला खूप आनंद झाला होता.
थोडक्यात सुकेसिनीच्या घरी तथागत बुद्धाने भिक्खू संघ आल्यामुळे आनंदी झाली होती.
तर राजाची राणी सुकेसिनी चे केस मिळाले त्यामुळे आनंदी झाली होती.
इकडे भोजनदान संपल्यानंतर तथागत बुद्धांना समजून चुकले की सुकेसिनीने आपले केस विकून आपल्या भोजनाची व्यवस्था केली. स्त्रियांचा खरा दागिना हा केस असताना देखील त्याचा त्याग करून आपल्याला भोजनदान दिले.
सुकेसिनी तथागत बुद्धांना म्हणते .मला आपल्या संघामध्ये भिक्खुणी करावी. तथागत बुद्धाने तिची विनंती मान्य केली. आणि तिला भिक्खूणी संघात प्रवेश दिला.
संजय सखाराम पवार
खांडोत्री
तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी
मो.न. 9137440340

अतिशय उदारमतवादी आणि दान पारमिता आत्मसात करणारी उदात्त भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांनी प्रेरित होऊन गेलेली करुणामय अंतःकरण असलेली सुकेशिनी अमर झाली 🙏🙏🌹🌹 नमो बुद्धाय 🙏