वर्षावासानिमित्त ग्रंथ वाचन समारोप संपन्न…..
प्रनिषा चिकटे यांनी केले “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाचे वाचन
लातूर (५) प्रतिनिधी-
वर्षावासानिमित्त भारतीय बौद्ध महासभा द्वारा आयोजित बाबासाहेब आंबेडकर लिखित “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाचे वाचन प्रनिषा चिकटे यांनी सिद्धार्थ हौसिंग, लातूर येथे केले. या ग्रंथ वाचनाचा समारोप कार्तिक पौर्णिमेनिमित्त करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षा आशाताई चिकटे यांच्या हस्ते आदर्शांच्या प्रतिमांचे पूजन करुन प्रनिषा चिकटेसह प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्षांनी पौर्णिमेचे महत्व सांगून बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानाचे उपासकांनी काटेकोरपणे पालन करावे, बुद्ध, धम्म आणि संघाबद्दल विशेष श्रद्धा बाळगावी तसेच बालवयातच आपल्या मुलांवर धम्माचे संस्कार करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेशी आपली कौटुंबिक नाळ जोडली जाणे, ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून धम्म दीक्षा समिती प्रमुख राहुल गायकवाड यांनी वर्षावासाचे महत्व सांगून वर्षावास काळामध्ये उपासक- उपासिकांचे कार्य व जबाबदाऱ्या यावर सविस्तर मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले, वडिलधाऱ्या उपासक व उपासिकांनी घरच्या जबाबदाऱ्या थोड्याशा कमी करुन जास्तीत-जास्त वेळ विहाराला द्यावा. कारण तेथेच आपणास सुख, शांती आणि समाधान मिळणार असल्याचे सांगितले. पुढे ते बुद्धकालीन “बहुपुत्रिका” नामक थेरीच्या आयुष्याची कहाणी सांगत, तीने तिचे दहा मुले आणि दहा सुनांच्या हेवेदाव्यांना कंटाळून आपल्या पतीप्रमाणे गृहस्थी जीवनाचा त्याग केला, सर्व तृष्णेचा त्याग केला आणि बुद्धांच्या भिक्खुनी संघात सामील झाली. ऐन वृद्धापकाळात दुःख मुक्तीच्या मार्गात सामील होऊन सुद्धा दुःख मुक्तीच्या सर्वोच्च पदी पोहोचली. म्हणजेच अर्हंत झाली. त्यामुळे आपणही या “बहुपुत्रिका” नामक थेरीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून “मी” आणि “माझे” या अहंकारी मोहात न अडकता, धम्माला प्रमाण मानुन आपले उर्वरित आयुष्य सुखकर करावे. त्यासाठी वेळोवेळी विहारात जावे आणि धम्म उत्तमप्रकारे जाणून घ्यावे, असे आवाहन केले. तसेच प्रनिषा चिकटे यांनी कमी वयात धम्माच्या मार्गांवर आरुढ झाल्याबद्दल त्यांचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
पुढे बौद्धाचार्य दत्ता सोनकांबळे, कासारशिरसी यांनी उपस्थितांना आर्यसत्य आणि आर्य आष्टांगिक मार्ग यावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी बौद्धाचार्य कमलाकर भाले, कासारशिरसी, नानासाहेब आवाड, धम्मदीक्षा उपप्रमुख सदानंद कापुरे, संघटक डॉ. लालासाहेब बनसोडे, सिद्धांत चिकटे, केंद्रीय शिक्षिका मायाताई कांबळे, उपाध्यक्षा मंगलताई सुरवसे, मयुरीताई आल्टे, मीरा मस्के, ललिता गायकवाड, विजया बनसोडे, विजया कांबळे, पंचशीला सुरवसे, कान्होपात्रा सोनकांबळे, शशिकला इंगळे, छाया सूर्यवंशी, पुष्पा बोडके, तब्बू आदी उपस्थित होते.
दूधखीरला बौद्ध धम्मात विशेष महत्व असल्यामुळे आशाताई चिकटेनी उपस्थितांना खीर दान केले आणि उपस्थितांचे आभार मानले.
भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक तथा बौद्धाचार्य लक्ष्मण कांबळे यांनी आपल्या अलंकारीक भाषा शैलीतून बुद्धांच्या जीवनातील प्रसंग सांगत सूत्र संचालन केले. शेवटी सरणत्तय गाथेंनी कार्यक्रमाची सांगता झाली.
