December 8, 2025

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

लातूर, दि. ०७ : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ही परीक्षा लातूर शहरातील ११ परीक्षा उपकेंद्रांवर रविवार, ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या कालावधीत होत आहे. त्याअनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या परीक्षा केंद्राच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

लातूर शहरातील बार्शी रोडवरील दयानंद कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड बीसीए, नांदेड रोडवरील यशवंत विद्यालय, जिजामाता कन्या प्रशाला, नारायणनगर येथील परिमल विद्यालय, खाडगाव रिंग रोड येथील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, खाडगाव रोडवरील सरस्वती विद्यालय, दयाराम रोड येथील श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय, शाहू चौक येथील ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खाडगाव रोड येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख कनिष्ठ महाविद्यालय, सरस्वती कॉलनी येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, श्याम नगर येथील श्री केशवराज विद्यालय या उपकेंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. 

परीक्षा कालावधीत या परीक्षा केंद्रावर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये अपर जिल्हाधिकारी केशव नेटके यांनी परीक्षा केंद्राच्या १०० मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरित्या प्रवेश करता येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करता येणार नाही. शंभर मीटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपींग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसारमध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तींकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करता येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेश मनाई राहील. हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी परीक्षार्थी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याबाबत त्यांचे परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. हे आदेश ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. www.samtapatra.online Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!