मनपा उपायुक्तपदी वसुधा फड रुजू
लातूर (7) प्रतिनिधी: लातूर शहर महानगरपालिकेच्या उपायुक्त म्हणून वसुधा फड गुरुवारी (दि. ६ ) रुजू झाल्या. विशेष म्हणजे यापूर्वीही सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांनी लातूर येथे काम केलेले आहे.आता पदोन्नतीने त्या लातूर येथे आल्या आहेत.
एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या वसुधा फड यांची २०१० मध्ये एमपीएससी मार्फत मुख्याधिकारी संवर्गातून निवड झालेली आहे. त्यांनी यापूर्वी नांदेड पालिकेत सहाय्यक आयुक्त, लातूर पालिकेत सहाय्यक आयुक्त, औसा नगरपालिकेत मुख्याधिकारी, गंगाखेड नगरपालिकेत मुख्याधिकारी आणि धाराशिव येथे मुख्याधिकारी म्हणून काम केलेले आहे. आता पदोन्नतीने त्या उपायुक्त म्हणून लातूर येथे रुजू झाल्या आहेत.
गुरुवारी (दि. ६) त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे, मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख, सहाय्यक आयुक्त खदीर शेख, पर्यावरण अधिकारी, सन्मती मेस्त्री, स्वच्छता विभाग प्रमुख, रमाकांत पिडगे,मालमत्ता व्यवस्थापक, शुभम बावने,शिक्षणाधिकारी श्वेता नागणे यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना वसुधा फड यांनी पालिका आयुक्त श्रीमती मानसी मॅडम यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त पदाच्या माध्यमातून लातूर शहरातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत राहण्याची ग्वाही दिली. लातूर शहराची माहिती असणाऱ्या अधिकारी उपायुक्त म्हणून रुजू झाल्याच्या भावना अधिकारी व विभाग प्रमुखांनी यावेळी व्यक्त केल्या.
