लातूर जिल्ह्यात एकल महिलांसाठी राबविली जाणार विशेष मोहीम; रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न
· विविध शासकीय विभागांची लवकरच कार्यशाळा
· पुढील तीन महिन्यातील कृती कार्यक्रम निश्चित होणार
लातूर, दि. १२ : जिल्ह्यातील एकल महिलांना शासकीय योजनांचा लाभ देवून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहीम राबविली जाणार आहे. या अंतर्गत रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुढील तीन महिन्यात या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी, कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार सर्व शासकीय विभाग प्रमुखांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या अनुषंगाने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ, जावेद शेख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संदीप यादव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
एकल महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देवून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. यासोबतच त्यांच्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार विषयक प्रशिक्षण आयोजित करावीत. 1 डिसेंबर 2025 पासून या अनुषंगाने पुढील तीन महिन्यांसाठी विशेष मोहीम हाती घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
