लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी जोरात:
इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू
लातूर(13), प्रतिनिधी :
लातूर शहर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. लातूर शहर जिल्हा काँग्रेस
कमिटीने इच्छूक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया जाहीर केली आहे.
अर्ज स्वीकृतीसाठी विशेष व्यवस्था
इच्छूक उमेदवारांचे अर्ज काँग्रेस भवन, लातूर येथे दि १५ नोव्हेंबर
पासून २३ नोव्हेंबर पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. ही प्रक्रिया सुरळीत
पार पाडण्यासाठी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने एका विशेष समितीची
स्थापना केली आहे.
या समिती कडे अर्ज स्वीकारण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असून या समितीत
बालाप्रसाद बिदादा, दगडूआप्पा मिटकरी, नामदेव इगे, रफीक सय्यद,प्रा.
सिद्राम कटारे, प्रा.प्रवीण कांबळे,संजय निलेगावकर,मनोज देशमुख या
प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे .
हे सर्व पदाधिकारी काँग्रेस भवन येथे सकाळी ११ ते 3 वाजेपर्यंत उपस्थित
राहून सर्व इच्छूक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारतील आणि
पक्षाच्या निवडणूक तयारीतील महत्त्वपूर्ण टप्प्याची पूर्तता करतील.
*माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तयारी*
काँग्रेस पक्षाचे राज्याचे माजी मंत्री, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य
प्रतोद तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण
ताकदीने काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. महानगरपालिकेवर
काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी सज्ज झाले
असून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज
मागवण्याची प्रक्रिया ही त्याच तयारीचा एक भाग आहे.
या संपूर्ण प्रक्रियेची माहिती लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे
अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातील उमेदवारीसाठी इच्छुक
असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
