पालक व ज्येष्ठ नागरीकांचे पालन पोषण व कल्याण कायद्याविषयी मार्गदर्शन
लातूर(१९), प्रतिनिधी : केंद्र सरकारचा समाज कल्याण व सक्षमीकरण विभाग व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार पालक व ज्येष्ठ नागरीकांचे पालन पोषण व कल्याण कायदा २००७ या विषयी जनजागृती करण्यासाठी लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि लातूर उपविभागीय कार्यालयाच्यावतीने मातोश्री वृद्धाश्रम येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय भारूका यांचे मार्गदर्शनाखाली झालेल्या जनजागृती शिबिरामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्यंकटेश गिरवलकर, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, मातोश्री वृद्धाश्रमाचे अध्यक्ष डॉ. महेश देवधर तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे संघटक डॉ. बी. आर. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
नायब तहसीलदार परमेश्वर कांबळे, मंडळ अधिकारी आर. के. झाडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर चे कर्मचारी व मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते.
‘वसुधैव कुटुंबकम’चा संदेश देणाऱ्या आपल्या देशात वृद्धाश्रमांची स्थापना होणे, ही खेदाची बाब आहे. घरातील आजी-आजोबा हे घराचा वारसा असतात. त्यामुळे घराण्याचा वारसा जपणे, घरातील प्रत्येक सदस्याची जबाबदारी आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव व्यंकटेश गिरवलकर यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरीकांची यादी पोलीस अधिक्षक कार्यालयात असणे गरजेचे आहे. तसेच ज्येष्ठ नागरीकांच्या तक्रारीचे निरासरण होण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयात हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून देण्यात आला असून ज्येष्ठ नागरिकांनी यामुळे मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक मनुष्य हा वयाची साठी ओलांडलेवर ज्येष्ठ नागरीक बनत असतो. त्यामुळे त्याची जाणीव ठेवून घरातील सर्व ज्येष्ठ नागरीकांची काळजी व हीत जपणे सर्वांची जबाबदारी आहे, असे उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी सांगितले. तसेच पालक व ज्येष्ठ नागरिकांचे पालन पोषण व कल्याण कायदा २००७ व महाराष्ट्र पालक व ज्येष्ठ नागरिकांचे पालन पोषण व कल्याण नियम २०१० मधील तरतुदींबाबत सविस्तर माहिती दिली.
.
