संविधान ग्रंथ दिंडीचे लातुरात आयोजन,
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जाहीर आवाहन
लातूर(१९), प्रतिनिधी –
दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकृत केले म्हणून याच दिवशी संबंध भारतभर “संविधान दिन” साजरा केला जातो. तसेच दिनांक 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. भारतीय संविधान हे आपल्या देशाचे मूलभूत कायदे, हक्क आणि जबाबदाऱ्या निश्चित करणारे सर्वोच्च दस्तऐवज आहे. प्रत्येक नागरिकांनी त्यातील तत्वे, मूल्ये आणि कर्तव्ये जाणून घेतली तर लोकशाही सक्षम होते.
संविधानाचे महत्व अनेक स्तरावर असून भारतीय संविधानात समाजवादी, धर्म धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्रांची एकता व एकात्मता बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे. जे की, देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेच्या मसूदा समितीच्या समतावादी संविधान रचना, वंचित, शोषित घटकांचे अधिकार सुरक्षित केले. त्यांचा सन्मान करण्यासाठी संविधानाच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून “संविधान दिंडी” चे सर्व लातूरकरांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये लातूर शहर व परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर(प.) च्या वतीने करण्यात आले आहे.
