दयानंद कला महाविद्यालय येथील शिबिरात सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन
लातूर, दि. २२ : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या किमान समान कार्यक्रमानुसार सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सायबर पोलीस ठाणे व दयानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच दयानंद कला महाविद्यालय येथे जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय भारूका यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्यंकटेश गिरवलकर, पोलीस निरीक्षक श्रीमती बबीता वाकडकर, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी लातूर वकील संघाचे अध्यक्ष अॅड. योगेश डी. जगताप, दयानंद कला महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. डॉ. अंजली जोशी, पर्यवेक्षक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
श्री. गिरवलकर यांनी यावली माहिती तंत्रज्ञान कायदा २००० बाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. सायबर गुन्हा म्हणजे काय, सायबर गुन्हेगार कोण असतात व ऑनलाईन घोटाळा, ऑनलाईन खंडणी हल्ला, सायबर छळवणूक, सायबर पाठलाग, ऑनलाईन अंमल पदार्थ तस्करी, बौद्धीक मालमत्ता उल्लंघन व ऑनलाईन भरती प्रकीया फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच सायबर गुन्हे टाळण्यासाठी काय दक्षता घ्यावी, याबाबत माहिती देताना श्री. गिरवलकर म्हणाले, संगणक अथवा मोबाईलमध्ये अद्यावत सुरक्षा अॅन्टीव्हायरस प्रणाली असणे गरजेचे आहे, तसेच सायबर गुन्हा घडल्यावर त्याबाबत तत्काळ सायबर पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे.
पोलीस निरीक्षक श्रीमती बबीता वाकडकर यांनी विद्यार्थ्यांना पीपीटीद्वारे सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन केले. आज सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे तरूण पिढीने सायबर गुन्ह्यांबाबत जागरूक असणे गरजेचे आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करूण वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे समाजात घडत आहेत, आर्थिक नुकसान, लैंगिक छळाच्या सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढीस लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
दयानंद कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. नागरगोजे यांनी विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यांबाबत सदैव जागरूक राहण्याचे आवाहन केले.
