लातूर रक्तदान महोत्सवात सहभागासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचे आवाहन
लातूर(२४) : संविधान दिनाचे औचित्य साधत लातूर शहरात आणि जिल्ह्यात वाढत्या रक्त तुटवड्याचा प्रश्न दूर करण्याच्या उद्देशाने लातूर शहरातील अकरा नामांकित सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन ‘लातूर रक्तदान महोत्सव 2025’ चे भव्य आयोजन केले आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमात प्रत्येक लातूरकराने उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले असून, मानवसेवेच्या या महोत्सवाला व्यापक समाजाने साथ द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या रक्तदान महोत्सवाची घोषणा करताना जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे म्हणाल्या की, “रक्तदान ही अनमोल देणगी असून एका रक्तपुंजातून अनेक जिवांचे प्राण वाचू शकतात. लातूर जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये वाढत्या शस्त्रक्रिया, प्रसूती, अपघातग्रस्त आणि गंभीर रुग्णांच्या उपचारांसाठी रोज मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. त्यामुळं सुरक्षित रक्तसाठा निर्माण करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे अत्यावश्यक बनले आहे.”
‘रक्तवीर लातूर – गौरव लातूर’ या प्रेरणादायी ब्रीदवाक्याने सजलेल्या या महोत्सवाचे आयोजन 26 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. संविधान दिनाच्या दिवशी होणारा हा उपक्रम लोकशाही मूल्यांची आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणारा ठरणार आहे. रक्तदान महोत्सव लातूर जिल्हा न्यायालयातील गेट क्रमांक 3 येथे सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.00 या वेळेत पार पडणार असून इच्छुक नागरिकांनी या वेळेत रक्तदानासाठी उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
रक्तदानासाठी आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा, सुसज्ज रक्तपेढ्या, अनुभवी डॉक्टर्स, नर्सिंग कर्मचारी आणि प्रशिक्षित स्वयंसेवकांची व्यवस्था आयोजक संस्थांकडून करण्यात आली आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय तपासणी तसेच नोंद प्रक्रिया सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण केली जाणार आहे. रक्तदानानंतर सहभागींना आवश्यक त्या सर्व सूचना व मार्गदर्शन प्रदान केले जाईल, असेही संस्थांनी स्पष्ट केले. लातूरकरांनी संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित या रक्तदान महोत्सवात सहभागी होत ‘रक्तवीर लातूर’ बनावे आणि ‘गौरव लातूर’ ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून साकारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे आणि आयोजक संस्थांकडून करण्यात आले आहे.
