December 8, 2025
002

लातूर जिल्ह्यातील सराफ व्यापाऱ्याचा संताप,तीन वर्षीय कु. यज्ञाला एक दिवस मार्केट बंद ठेवून श्रद्धांजली
लातूर(२४), प्रतिनिधी — नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मौजे डोंगराळे या गावात सुवर्णकार समाजातील केवळ तीन वर्षांच्या चिमुरडी कु. यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर निर्घृण हत्या झाल्याची घटना घडल्याने संपूर्ण सुवर्णकार समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या भयानक घटनेने समाजासह सर्वसामान्य नागरिकही हादरले आहेत.या निष्पाप बालिकेला न्याय मिळावा आणि दोषींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी लातूर जिल्हा सराफ सुवर्णकार असोसिएशनतर्फे सोमवारी संपूर्ण दिवस लातूर शहरातील तसेच जिल्ह्याभरातील सराफ सुवर्णकार मार्केट तसेच संबंधित व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली.
    या बंदमध्ये सराफ सुवर्णकार व्यापाऱ्यांसह अटणीवाले, बंगाली कारागीर, गठायीवाले आणि इतर कारागीर मोठ्या संख्येने सहभागी झाले. दिवसभर मार्केट बंद पाळून व्यापाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.या प्रसंगी असोसिएशनच्या वतीने मा. जिल्हाधिकारी, लातूर यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की, निष्पाप बालिकेला न्याय मिळेपर्यंत समाज शांत बसणार नाही. या गुन्ह्याची चौकशी जलदगतीने करून खटला फास्टट्रॅक न्यायालयात वर्ग करण्यात यावा आणि दोषींना फाशीची शिक्षा ठोठावावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रशासनाने अशा प्रकारच्या घृणास्पद आणि मानवतेला काळिमे फासणाऱ्या घटनांना रोकण्यासाठी कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी समाजाच्या वतीने मांडण्यात आली आहे.
या निवेदन प्रसंगी लातूर जिल्हा सराफ सुवर्णकार असोसिएशनचे राजाभाऊ बोकन,रामभाऊ चलवाड,विकास चामे,अमित भोसले, अजय भूमकर, बजरंग वर्मा, गजेंद्र बोकन, शुभम पाटील, शैलेश टेहरे, ओमकार तरटे, शिवनारायण माकणीकर, दत्ता पंडित, रवी पोद्दार, रामेश्वर पाटील, नामदेव पोतदार, जमादार आदी मान्यवर उपस्थित होते.व्यापाऱ्यांनी या निमित्ताने स्पष्ट संदेश दिला की, अशा पाशवी कृत्यांनी मानवी समाजाचे रूप कलंकित होते आणि त्यामुळे दोषींविरुद्ध आदर्श शिक्षा देणे अत्यंत आवश्यक आहे. निष्पाप यज्ञाच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजाने एकजुटीने आवाज उठवून मानवतेचा दीप प्रज्वलित ठेवण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. www.samtapatra.online Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!