राग, द्वेष आणि मोह हे मनाचे विकार – भंते महाविरो थेरो
उमरगा, (प्रतिनिधी)- मानवाला दुःखातून मुक्त करणे हा धम्माचा हेतू आहे. बुद्धांनी तृष्णा मुक्तीचा मार्ग दाखविला तृष्णेतून सुटका झाली की, दुःख मुक्तीचा मार्ग सापडतो. धम्म काया, वाचा, मनाची शुद्धता शिकवितो. जो आपल्या कर्मावर स्मृतीपूर्वक लक्ष ठेवतो तोच खरे धम्म जीवन जगतो. राग, द्वेष, मोह हे मनाचे विकार असून प्राणी हिंसा, खोटे बोलणे, मादक पदार्थाचे सेवन न करणे, चोरी न करता व्यभिचाराला तिलांजली देऊन, पार लौकिक जीवनाचा आनंद घ्यावा, असे प्रतिपादन भन्ते महाविरो थेरो यांनी केले.
तालुक्यातील तुगाव येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत प्रमुख धम्म देसना देताना ते बोलत होते. या वेळी भन्ते धम्मासार थेरो,भन्ते सुमंगल, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे, जि.प. चे माजी सभापती हरिष डावरे, रिपाइंचे राज्य कार्यकारणी सदस्य एस. के. कांबळे चेले, दिलीप भालेराव,प्रा एस.एम. गायकवाड, मिलींद कांबळे गुरुजी उमापुरकर, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, बाबासाहेब गायकवाड, दगडू भोसले,अरुण लोखंडे, डॉ. शुद्धोधन कांबळे, आदींची उपस्थिती होती.
पहिल्या सत्रात उपस्थित भन्तेजीच्या हस्ते धम्म ध्वज फडकविण्यात आला आणि धम्म परंपरेनुसार आदर्शाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती जीवंत ठेवण्यासाठी सर्व पक्ष गट तट बाजूला ठेऊन बौद्ध अनुयायांनी एकत्र येऊन धम्माचें आचरण करून नीतिमान समाज घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन करण्यात आले.
समारोपाच्या सत्रात उपस्थित बौद्ध उपासकांना मार्गदर्शन करतांना भन्ते महाविरो म्हणाले की, तुगाव या गावात ही दहावी धम्म परिषद आहे. म्हणजे दहा वर्षात धम्माचे खूप चांगले पीक येणे आवश्यक आहे. तथागत भगवान बुद्धांनी राजवैभवाचा त्याग करून गृहत्याग केला. त्यांच्या पायांशी सुख लोळण घेत असतानाही त्यांनी गृहत्याग केला. हातात मातीचे भांडे घेऊन घरातून बाहेर पडले विमुक्तीचा साक्षात्कार करण्यासाठी शिळे अन्न खाल्ले असल्याचे सांगितले. पुढे ते म्हणाले, मनाला शांत करणे ही विद्या आहे. विपश्यना साऱ्या दुःखातून मुक्त करते, मन म्हातारे होत नाही, ९० वर्षाच्या माणसाचं मन तेवढंच तल्लख असते.
जेंव्हा मन शांत होते तीच तृष्णा विमुक्ती आहे. या विश्वात विपश्यने येवढे सुख कोठेच नाही. मनाला शांत करण्याचे सुख कोठेच नाही जो स्वतःच्या मनाला जिंकतो तो कोठेही पराजित होत नाही असे ते म्हणाले. मरताना मनाला शांत करणे म्हणजे सुखाने मरण यावे. यासाठी मनशांती आवश्यक आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष भालचंद्र लोखंडे यांनी तर सूत्रसंचालन गुंडू कांबळे यांनी केले. परिषदेस अध्यक्ष शाहूराज भोसले, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, सचिन बनसोडे, शरद कांबळे,राजकुमार कांबळे, संकल्प कांबळे, छाया बगाडे, बलभीम गायकवाड, धर्मेंद्र कांबळे, सचिन बनसोडे,सागर भोसले, नंदकुमार गायकवाड, गोपाळ सुरवसे, सुदर्शन कांबळे,अमृत कांबळे, विद्याचंद्र कांबळे, नीलकंठ कांबळे, दत्ताभाऊ कांबळे, धर्मा बनसोडे, विशाल कांबळे, लोकेश कांबळे, आकाश कांबळे, सूरज गायकवाड, सुधाकर गायकवाड,शिवाजी कांबळे, दिगंबर कांबळे, कान्हा जाधव आदींनी परिश्रम घेतले.
