
मालमत्ता कर भरण्यासाठी पालिकेतर्फे व्हॅन
लातूर : लातूर महानगरपालिका कर आकारणी व कर संकलन विभागाने यंदा १०० कोटींच्या मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य निश्चित केले असून त्याच्या पूर्ततेसाठी प्रशासनाकडून वेगवेगळे उपाय केले जात आहे. मालमत्ता करातील सामान्य करावर विविध सवलत देऊन पालिकेने सप्टेंबरअखेरपर्यंत ३५ कोटींची वसुली केली आहे. करदात्याच्या दारी जाऊन कर वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून स्मार्ट करसंकलन प्रणाली ही ”मोबाइल व्हॅन” सेवा सुरू करण्यात आली आहे.
आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी व उपायुक्त (कर संकलन) डॉ पंजाब खानसोळे यांच्या संकल्पनेतून ही व्हॅन कार्यान्वित करण्यात आली आहे . मालमत्ता कर शास्ती सूट योजना प्रसिद्धी व प्रचार करणारी ही व्हॅन शहरात दाखल झाली आहे. आज या व्हॅन चे उद्घाटन जिल्हा प्रशासन अधिकारी (नगर पालिका) लातूर श्री अजित डोके व उपायुक्त डॉ पंजाब खानसोळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी कर अधीक्षक प्रतिक मुसांडे, भांडारपाल बालाजी शिंदे , क्षेत्रीय अधिकारी श्री बंडु किसवे,संतोष लाडलपुरे यांची उपस्थिती होती .
सदरील व्हॅन मुळे नागरिकांना सध्या सुरू असलेल्या ८०% शास्ती माफी योजनेची माहिती मिळण्यास मदत होणार आहे . तसेच शहरातील करदात्यांना आपल्या दारातच कर भरणे सोयीचे होणार आहे.करदात्यांकडूनही या सुविधेस चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा उपायुक्त डॉ खानसोळे यांनी यावेळी व्यक्त केली .
या व्हॅन मधे संगणक, प्रिंटर व त्याकरिता लागणाऱ्या सर्व सुविधा तसेच ऑपरेटर, ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकही पुरवण्यात आले आहेत.
या व्हॅनद्वारे एखाद्या नगर/सोसाइटी/संस्थेमध्ये मालमत्ता कर वसूल करावयाचा असल्यास ही व्हॅन त्या प्रभाग कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे . या व्हॅनद्वारे मालमत्ता करदात्यांनी कर देयकाची मागणी केल्यास देयकही देण्यात येणार आहे . यामध्ये धनादेश, धनाकर्ष अथवा डेबिट कार्ड, एटीएम कार्डने कर भरण्याची व पावती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सर्व थकबाकीदार मालमत्ता धारकानी सध्या सुरू असलेल्या ८०% शास्ती माफी योजनेचा लाभ घेवून आपला थकीत टॅक्स भरणा करावा असेही आवाहन यावेळी उपायुक्त डॉ पंजाब खानसोळे यांनी केले आहे.