शताब्दी पर्यंत एक लाख समता सैनिक उभा करणार
– डॉ भीमराव य आंबेडकर
मुंबई (2) –
जसा काळ बदलला त्यानुसार पूर्वी मिलिटरी, नेव्ही, एअर फोर्स मध्ये महिलाना प्रवेश नव्हता तो आता सुरू झाला आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी/राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी सांगून आम्ही महिलांच्या समावेशासह समता सैनिक दलाच्या 2027 च्या शताब्दी पर्यंत “एक लाख पुरुष व महिला समता सैनिक ” निर्माण करण्याचा संकल्प केला असल्याचे जाहीर केले. डॉ भीमराव य आंबेडकर हे समता सैनिक दलाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी, दादर येथे दि. 1/11/2025 ते 2/11/2025 या दोन दिवसीय महिला सैनिकांचे केंद्रीय सैनिक शिक्षक प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते.
ज्या संघटनेला शंभर वर्षे पूर्ण झाली त्यामध्ये स्त्री -पुरुष समानता कुठे आहे?
-ॲड एस के भंडारे
ज्या संघटनेला शंभर वर्षे पूर्ण झाली त्यामध्ये पुरुष महिला समानता कुठे आहे?, त्यात महिलांचा सहभाग नाही मात्र बौद्धांमध्ये स्त्री -पुरुष समानता असल्याने भारतीय बौद्ध महासभेमध्ये व समता सैनिक दलामध्ये महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी महिलांचा सहभाग सुरू केला, त्यानंतर आता डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी पुरुष व महिला कार्यकारणी वेगवेगळ्या करून महिलांना समानता देऊन स्वतंत्र काम करण्याची संधी दिलेली आहे. आता बीएसआय मिशन : 25 नुसार येणाऱ्या 2027 मध्ये समता सैनिक दलाच्या शताब्दी पर्यंत एक लाख सैनिक बनवायचे आहेत त्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये 2000 सैनिक निर्माण करायचे असून त्यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असला पाहिजे असे आवाहन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ॲड एस के भंडारे यांनी केले. त्यावेळी उपस्थित सर्व महिला सैनिक, अधिकाऱ्यांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.हे शिबिर ॲड एस के भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे शिक्षक म्हणून असिस्टंट स्टाफ ऑफिसर अशोक कदम व डी एम आचार्य, लेफ्टनंट जनरल चंदाताई कासले , मेजर जनरल मोहन सावंत व वंदनाताई सावंत इत्यादींनी शिबिरार्थीना प्रशिक्षण दिले.यामध्ये ड्रिल, भारतीय संविधान,IPC, पिटी परेड,प्रथमोपचार इत्यादीचे प्रशिक्षण देण्यात आले.
समारोप प्रसंगी डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि सर्व सैनिक अधिकारी यांनी समता सैनिक दलाची प्रतिज्ञा आणि भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेची सामूहिक शपथ घेतली. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय महिला विभागाच्या प्रमुख सुषमाताई पवार, उपप्रमुख रागिणीताई पवार, दलाचे रविंद्र इंगळे व मंगेश अडसुळे इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट जनरल चंदाताई कासले यांनी केले. या शिबिरात महाराष्ट्र व कर्नाटक मधील एकूण 26 जिल्ह्यातील महिला सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी समता सैनिक दलाचे लेफ्टनंट जनरल व चैत्यमीचे व्यवस्थापक प्रदीप कांबळे , हेडक्वार्टर उपसचिव निलेश पवार, विनिता माने, सागर गांगुर्डे इत्यादींनी परिश्रम घेतले.
