December 8, 2025
Khel

भारताच्या वाघिणींचे सुवर्णपान:एका आकांक्षेपासून विश्वविजयापर्यंत…!
लातूर, दि. 03 :

       तुम्ही मैदानावर इतिहास नाही भविष्य लिहिले…मैदानावरच्या त्या क्षणी वेळ थबकली होती. आपल्या धडधडत्या हृदयाचे ठोकेही जणू श्वास रोखून पाहत होते— हरमनप्रीत कौरने जेव्हा तो अंतिम झेल हातात घट्ट पकडला…! एक आवाज उमटला— पहिले सौम्य… मग गर्जना… आणि मग— “भारत विश्वविजेता!” होय— भारताची मुलगी, भारताची विजेती झाली होती! नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून प्रथमच वर्ल्ड कपला गवसणी घातली आणि इतिहासाचे पान सुवर्ण अक्षरांनी चमकू लागले. भारतीय महिला संघाने इतिहास रचला, जो केवळ क्रीडा नव्हे, तर शक्ती, सामर्थ्य आणि स्त्रीत्वाला नवा अर्थ देणारा बदल होता.
हा विजय केवळ २०२५ चा नव्हता, तर २०१७ च्या जखमेवर लावलेला मायेचा मलम होता. एकदा जवळ येऊन निसटलेला तो विश्वचषक, मनातून खोलवर पुरलेला दुखरा काटा होता. त्याच स्मृतींनी आज विजयाचा दिवा पेटवला आणि “अद्याप अपूर्ण आहे कथा…” असा धगधगता शपथेचा ज्वालामुखी शांत झाला.
हरमनच्या पकडो कॅच जितो मॅचने केवळ सामना नव्हे, तर भारताच्या नियतीची पकड मजबूत केली. हा विजय गाव-गल्लीपासून वर्ल्ड स्टेडियमपर्यंतचा प्रवास होता, जिथे खेळातली चूक कधी रडवून गेली, तर समाजाचा उपहास कधी जखमा देऊन गेला; पण त्या जखमेचा मलम— जिद्द नावाचा होता!
केवळ प्रयत्नच नाही तर नियतीसुद्धा या भारतीय वाघिणींच्या बाजूने होती. कर्णधार हरमनने मिड ऑनला आणि स्मृतीने मिड ऑफला उभे राहून मध्यमगती गोलंदाज रेणुका ठाकूरला चिअर अप करत राहणे, अमनज्योतला एकाच झेलासाठी तीन संधी मिळणे, आणि शेवटी हरमनच्या हाती अखेरचा झेल स्थिरावणे, ही प्रयत्नांना नियतीची मिळालेली जोड होती.
हा विश्वविजय केवळ एक ट्रॉफी नव्हती, तर मुलींमध्ये वाढणाऱ्या खेळाची आवड आणि राष्ट्राच्या कीडा क्षेत्राची ती पावती होती. आज पहिल्यांदाच स्टेडियमची सीट्स नव्हे— समाजाची मानसिकता भरून वाहत होती!
      हा प्रवास ‘भारताची मुलगी’ ते ‘भारताची विजेती’ – शक्ती, सामर्थ्य, स्त्रीत्वाचा आहे. भारतीय वाघिणींच्या प्रत्येक धावेमध्ये त्यांच्या संघर्षाचे अक्षर होते, प्रत्येक विकेटमध्ये त्यांच्या अपमानाचा प्रतिउत्तर होता. त्यांनी दाखवून दिले की “विजयाला लिंग नसते!” २१ वर्षीय शेफाली वर्मा ही या विजयाची नायिका ठरली. संघाबाहेरून रिप्लेसमेंट म्हणून आलेली आणि अंतिम सामन्यात ८७ धावा आणि २ महत्त्वाच्या विकेट्स घेऊन सामनावीर पुरस्कार जिंकणारी ती पुरुषांच्या आणि महिलांच्या क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरली. तिने केवळ चेंडू मारला नाही, तर समाजाच्या पुराणमतवादी दृष्टीला सीमारेषेबाहेर फेकले! दीप्ती शर्मा मालिकेत आणि अंतिम सामन्यात (५/३९) तिची अष्टपैलू कामगिरी, तसेच तिचा अखेरचा बळी नियती सुसंगत होता.
       हा विजय व्यापक स्त्री-सक्षमीकरणाचे प्रतिक आहे. आज प्रत्येक आई म्हणाली— “ही माझी मुलगी आहे!” आणि प्रत्येक बाबांचे डोळे म्हणाले— “मी तिसऱ्यांदा जन्म घेतला— पहिल्यांदा तिला जन्म देताना, दुसऱ्यांदा ती खेळताना, आणि आज— ती जिंकताना!” हे यश दाखवून देते की, “पोरी खेळतात” ते आता “पोरी जिंकतात” यात बदलले आहे.
विजयातही प्रतिस्पर्ध्यांना मिठी देणारी हीच तर भारतीय संस्कृतीची सौम्यता! मॅरिझान कॅप पराभवानंतर रडत असताना, भारतीय खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांनी तिला मिठी मारून धीर दिला. पराभवातही सन्मान दाखवणारी ही खिलाडूवृत्ती जगाला भावली, जी ट्रॉफी जिंकण्याहून अधिक महान आहे.
संघाच्या यशामागे कर्णधार हरमनप्रीत कौर आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचे शांत, पण धगधगते नेतृत्व होते. हरमन डोळ्यात पाणी असूनही चेहऱ्यावर शांतता ठेवणारी हरमन, टीम इंडियाला शांतपणे फिनिशिंग लाईनपर्यंत घेऊन गेली. तिच्या नेतृत्वातील आग, आस्था आणि “कप हाती नव्हे, मनात घेऊन खेळणे” या तत्त्वाने इतिहास घडवला.
ज्या अमोल मुजुमदारला खेळाडू म्हणून कधीही आंतरराष्ट्रीय सामना खेळायला मिळाला नाही, त्याने आज ‘आंतरराष्ट्रीय विजेता संघाचा सूत्रधार’ म्हणून इतिहास रचला. विजयानंतर हरमनने जेव्हा भरल्या डोळ्यांनी अमोल मुजुमदारच्या पाया पडली, ती हजार वेळा प्रेम करावे अशी फ्रेम होती! त्याचा शांत नेतृत्व, मानसिक मजबुती आणि अचूक रणनीती हेच या यशाचे गमक आहे. “छायेतील सूर्य” असलेल्या या प्रशिक्षकाने, कधी न खेळलेल्या खेळाडूने विजेते घडवले.
       या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय महिला क्रिकेटला आर्थिक समानता आणि सन्मानाचा नवा अध्याय मिळाला आहे. टीम इंडियाने विश्वचषक जिंकून ४.४८ दशलक्ष (सुमारे ४० कोटी रुपये) इतकी विक्रमी बक्षीस रक्कम जिंकली आहे. पुरुष किंवा महिला क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे, जी समानतेच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे. तसेच पुरुषांच्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाला दिलेल्या १२५ कोटी रुपयांइतकीच बक्षीस रक्कम महिला संघासाठी जाहीर केली आहे, ज्यामुळे महिला क्रिकेटला अभूतपूर्व पाठिंबा मिळाला आहे.
      यानिमित्ताने असे म्हणावे लागेल महिला प्रीमियर लीग सारख्या स्पर्धांमुळेच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दबावात खेळण्याचा अनुभव मिळाला, ज्यामुळे त्यांना विश्वचषकासारख्या मोठ्या स्तरावर कामगिरी करणे शक्य झाले. या विजयामुळे “विश्वकप” नव्हे, तर “महिला विश्व कप” या शब्दाला जगात नवी ओळख मिळाली आहे. हा विजय हे भारतीय महिला क्रिकेटमधील नव्या युगाची सुरुवात आहे. देशभरातील प्रेक्षकांचे धडधडणारे हृदय, हजारो मोबाईल-टीव्हीसमोर गोठलेली नजर, आणि शेवटी गर्जनाऱ्या आवाजात एकच घोषणा जय हिंद ! जय भारताच्या मुलींनो!
      हा विजय भारतीय महिला क्रिकेटचा नाही, तो प्रत्येक भारतीयाच्या आत्मविश्वासाचा, प्रत्येक मुलीच्या स्वप्नांचा आणि एका नव्या भारताच्या भविष्याचा पाया आहे. या विजयाच्या ट्रॉफीला धूळ बसू शकेल, पण या दिवसाच्या अभिमानाला— कधीच नाही! या मुलींनी दाखवून गेल्या “उड्डाणाला पंखांपेक्षा उत्साहाची गरज असते.” त्यांनी इतिहास नाही, भविष्य लिहिले आहे!

     – राहुल हरिभाऊ इंगळे पाटील

         मो. ९८९०५७७१२८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. www.samtapatra.online Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!