गरुड चौक ते पिंटू हॉटेल परिसरात कायमस्वरूपी पोलीस मदत केंद्र व वाहतूक पोलीस नियुक्तीची पूर्वभाग कृती समितीची मागणी
लातूर (4): –
लातूर शहराच्या पूर्व भागात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे आणि वाहतूक विस्कळीततेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर लातूर शहर पूर्व भाग नागरी कृती समितीने गरुड चौक तेपिंटू हॉटेल परिसरात कायमस्वरूपी पोलीस मदत केंद्र उभारणीसह वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पिंटू हॉटेल ते गरुड चौक या परिसरात अलिकडेच धारदार शस्त्रासह युवकांमध्ये झालेल्या मारामारीनंतर स्थानिक नागरिकांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तसेच 361 क्रमांकाच्या महामार्गाच्या विकसित रस्त्यामुळे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली असून सिग्नल बंद असल्याने वाहतूक गोंधळ आणि अपघाताचे प्रमाणही वाढत आहे.नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि वाहतूक शिस्तीच्या अंमलबजावणीसाठी गरुड चौकात वाहतूक पोलीस कायमस्वरूपी तैनात करावेत तसेच पिटु हॉटेल परिसरात पोलीस मदत केंद्र स्थापन करावे, अशी मागणी कृती समितीने केली आहे.सदर निवेदनावर समितीचे अध्यक्ष दीपक गंगणे, सचिव बाबासाहेब बनसोडे, कमलाकर कांबळे, भगवेश्वर धनगर, दत्ता मामडगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
