श्रीकिशन सोमाणी विद्यालयात आयोजित रिलेशानी प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर(4) :
येथील अभिनव विकास संस्था द्वारा संचालित श्रीकिशन सोमाणी विद्यालयात पुण्याच्या आरोग्यभान संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘ रिलेशानी ‘या प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आरोग्यभान संस्थेचे मोहन देस, श्रुती व माणिक यांनी किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये जे शारीरिक आणि मानसिक बदल होतात, त्यातून विद्यार्थ्यांना जे प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची विद्यार्थ्यांना समजतील अशा पद्धतीने समाधानकारक शास्त्रीय उत्तरे दिली. किशोरवयीन मुली – मुलांना असे अनेक प्रश्न मानसिकदृष्ट्या नाहक गुरफटून टाकत असल्याचे सर्वज्ञात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यासंदर्भात शास्त्रोक्त मार्गदर्शन आणि समुपदेशन व्हावे या उद्देशाने सदर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मोहन देस व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना कोणतेही व्याख्यान, भाषण न देता नाट्य, चित्र, संगीत आदी विविध माध्यमांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांच्या भावनांचा ठाव घेऊन त्यांना परस्परांशी जिव्हाळ्याचे, आपुलकीचे संबंध कसे बनवायचे याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.
या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांना जे प्रशिक्षण देण्यात आले, मार्गदर्शन करण्यात आलेल्या त्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांसमोर त्याचे नाट्यमय पद्धतीने अतिशय प्रभावी असे सादरीकरण करून उपस्थित सर्वांची मने जिंकली. या प्रशिक्षण शिबिरात आलेले अनुभव सांगताना अनेक विद्यार्थी अक्षरशः भावविवश झाले. एका विद्यार्थिनीला तर अनुभव कथन करताना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. यावरून हे शिबीर किती प्रभावी आणि यशस्वी ठरले याची कल्पना येऊ शकते. या शिबिराच्या समारोप सोहळ्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा, सचिव कमलकिशोर अग्रवाल, शालेय समितीचे अध्यक्ष अतुल देऊळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रमाकांत स्वामी यांनी केले. प्रास्तविकात त्यांनी या प्रशिक्षण शिबिराच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. शालेय समितीचे अध्यक्ष अतुल देऊळगावकर यांनी विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना द्यावा असे आवाहन केले. किशोरवयीन मुलांना योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळाल्यास ते उद्याचे आदर्श नागरिक घडू शकतात. त्याकरिता अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले. या प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रमाकांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी, सुनीता जाधव, राहुल पांचाळ यांच्यासह सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
