December 8, 2025
latur-City

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

लातूर, दि. 6  :

कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व (3) नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 6 नोव्हेंबर, 2025 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते 20 नोव्हेंबर, 2025 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन) लागू राहील.

शस्त्रबंदी व जमावबंदी काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणजे वाद्य वाजविण्यास मनाई राहील. ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे, चित्रे, चिन्हे फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन किंवा प्रसार करणे यास मनाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास, मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अंत्ययात्रा, विवाह, कामावरील पोलीस किंवा इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना लागू राहणार नाही. तसेच शस्त्रबंदी व जमावबंदी काळात सभा, धार्मिक मिरवणूक, मोर्चा, उपोषण यांना परवानगी देण्याचे सर्व अधिकार हे पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक व संबंधित पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांना राहतील. त्यांनी परवानगी देण्यापूर्वी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून परवानगी द्यावी, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. www.samtapatra.online Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!