वर्षावासानिमित्य आयोजित प्रवचन मालिकेचा समारोप
लातूर(७) प्रतिनिधी-
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा, लातूरच्यावतीने आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये ग्रंथ वाचन व प्रवचन मालिकेचे माता रमाई बुद्ध विहार, पाखरसांगवी येथे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रवचन मालिकेचा आज समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा शारदाताई हजारे व उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांच्या हस्ते आपल्या आदर्शांचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी बौद्धाचार्य डी. पी. भोसले सर यांनी वर्षावासाबद्दल मार्गदर्शन केले.
केंद्रीय शिक्षिका तथा प्रवचनकार कविताताई कांबळे यांनी महाराष्ट्र शासनाने ७ नोव्हे. हा दिवस “विद्यार्थी दिन” साजरा करण्यास सांगितले. हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिवस आहे. हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून का? साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.
पुढे प्रमुख पाहुणे तथा धम्म दीक्षा समितीचे जिल्हा प्रमुख राहुल गायकवाड यांनी वर्षावासाचे महत्व तसेच बुद्धकालीन वर्षावास आणि आजच्या वर्षावासाचे बदलते स्वरूप याची तुलनात्मक मांडणी करुन, आजच्या बदलत्या वर्षावासाच्या संकल्पनेबद्दल चिंता व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, वर्षावास काळात भारतीय बौद्ध महासभेकडून २४ विहारामध्ये विविध विषयावर प्रवचन मालिकेचे आयोजन केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेचा मूळ उद्देश संपूर्ण समाजाला धम्माच्या मार्गांवर आणणे हाच आहे. हा उद्देश साध्य करण्याचे काम भारतीय बौद्ध महासभा अविरतपणे आणि प्रामाणिकपणे करीत आहे. त्यासाठी उपासक-उपासिकांनी मोठ्या संख्येने विहारात येणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच या मातृसंस्थेला दानाच्या माध्यमातून बळकट करण्याचे आवाहन केले.
पुढे माजी सरचिटणीस अशोक शिंदे सर यांनी प्रज्ञा, शील आणि समाधी तसेच मैत्री यावर आपले विचार मांडले आणि शीलाचे काटेकोरपणे पालन करावे तसेच उपासकांनी प्रत्येक रविवारी विहारात येण्याचे आवाहन केले. त्यानंतर तालुका अध्यक्षा सुनीताताई हजारे यांनी आपले विचार मांडून शुभेच्छा दिल्या.
शेवटी शारदाताई हजारे यांनी उपासक-उपासिकांनी महिने ग्रंथाचे वाचन करुन आपण धम्माच्या मार्गांवर आरुढ होत असल्याचे समाधान व्यक्त करुन, सर्वांना शुभेच्या दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केंद्रीय शिक्षक लक्ष्मण कांबळे सर यांनी केले तर आभार सुधाताई सोनवणे यांनी मानले.
याप्रसंगी केंद्रीय शिक्षिका मायाताई कांबळे, जिल्हा सरचिटणीस वंदनाताई कांबळे सह परिसरातील सपनाताई देडे, त्रिशलाताई कांबळे, क्रांतीताई हाके, गवळी, विमलताई कांबळे, मीराताई ठोके, सावित्रीताई मस्के, शारदाताई गजधने आदी उपस्थित होते.
