December 8, 2025
Ghuge-min

दिव्यांगांना सक्षम बनविण्यासाठी प्रशासन कटिबध्द- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

· दिव्यांगांप्रती जाणीव जागृती जिल्हा कार्यशाळेत 430 जणांचा सहभाग

लातूर, दि. ११  : दिव्यांगांप्रती सन्मान आवश्यक आहे. दिव्यांगासाठी आता स्वतंत्र विभागाची स्थापना झाली असल्याने त्यांना मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ सुलभ होण्यास मदत झाली असून जिल्हा प्रशासन दिव्यांगांना सक्षम बनविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी मंगळवारी केले.

जिल्हा प्रशासन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात झालेल्या दिव्यांगांप्रती संवेदनशीलता व जाणीव जागृती जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, केंद्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुरेश पाटील, जिल्हा न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. श्रीराम देशपांडे, डॉ. राजेश पाटील, डॉ. योगेश निटुरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे म्हणाल्या, ही कार्यशाळा जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची असून दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेमुळे कायदेशीर अधिकार सर्वांना परिचित होवून जनजागृती होण्यास मदत होणार आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही दिव्यांगाप्रती संवेदनशीलतेने काम करून आपली जबाबदारी पार पाडावी. दिव्यांगांसाठीच्या आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

दिव्यांगांप्रती संवेदनशीलता व जाणीव जागृती या कार्यशाळेतून सामाजिक व न्यायिक चर्चा होणार असून यामुळे मोठे बदल होतील. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 हा दिव्यांगांसाठी महत्वाचा असून यामुळे त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळेल. प्रशासनही विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांना आधार देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी सांगितले.

प्रास्ताविकात जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून दिव्यांगांच्या विविध कायद्यांची माहिती अधिकारी, कर्मचाऱ्यांना होईल असे सांगून विविध 10 फॅक्टर, दिव्यांगांसाठी पार्किंग, रॅम्प, भरती प्रक्रिया व निधी खर्चाची माहिती दिली.

सूत्रसंचालन व्यंकट लामजने यांनी केले तर आभार वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता डॉ. राजु गायकवाड यांनी मानले. यशस्वीतेसाठी सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे, अण्णासाहेब कदम, जयश्री कुलकर्णी, नरसिंग बिरादार, विजय बुरांडे, शिवप्रसाद भंडारे, श्रीकृष्ण लाटे, गणेश पाटील, बालाजी बनसोडे, राजकुमार पवार, ज्ञानेश्वर राव, श्रीकांत उंबरे, गजानन बन, यांच्यासह जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयातील व दिव्यांग शाळांतील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

या कार्यशाळेस जिल्हयातील विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. या कार्यशाळेत जिल्हयातील 430 जणांनी सहभाग नोंदविला.

मंगळवारी दिवसभर झालेल्या या कार्यशाळेत विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यात ॲड. श्रीराम देशपांडे यांनी दिव्यांग व्यक्तीचे हक्क, स्पेशल कोर्ट, सुरेश पाटील यांनी दिव्यांग व्यक्ती समाज व प्रशासन यांची दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनामधील भुमिका, डॉ. योगेश निटुरकर यांनी आरोग्य् व पुनर्वसन, सतीश भापकर यांनी शिक्षण व पुनर्वसन, सुरज बाजुळगे यांनी सुगम्यतेबाबत मार्गदर्शन केले. यासह व्यंकट लामजने यांनी सेवा सुविधा व जिल्हास्तरावरील विविध समिती रचना व त्यांची कार्ये, विठ्ठल गाडेकर यांनी दिव्यांगाच्या कौशल्य विकासाबाबतचे मार्गदर्शन तर दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी विविध विभागाच्या रोजगार व नोकरी आरक्षण, निधीचा विनियोग याविषयी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. www.samtapatra.online Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!