लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत बाल दिनानिमित्त यशवंत विद्यालय येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
लातूर, दि. १८ : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या समान कार्यक्रमानुसार लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर जिल्हा न्यायालय व कलापंढरी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय भारूका यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत विद्यालय येथे शुक्रवारी बाल दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्यंकटेश गिरवलकर यांनी बाल दिन का साजरा केला जातो, कायद्यानुसार बालकाची व्याख्या काय, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या २०२४ मधील योजनेनुसार मुलांसाठी अनुकूल विधी सेवा योजनेबाबत, तसेच बालकांचे कायदेशीर हक्क व अधिकार याबाबत मुलांना मार्गदर्शन केले.
यावेळी यशवंत विद्यालयातील मुख्याध्यापिका डॉ. सुवर्णा जाधव, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. माधवराव गादेकर, कलापंढरी संस्थेचे अध्यक्ष बी.पी. सूर्यवंशी, वकील सुनैना बायस व विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. बाल दिनानिमित्त यशवंत विद्यालयात चित्रकला, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
बालकांच्या संरक्षण, अधिकार व हक्कासाठी असलेले किशोर न्याय (काळजी व संरक्षण) कायदा २०१५, लैंगिक गुन्हयापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२, बालविवाह प्रतिबंध कायदा २००६, बाल मजुरी प्रतिबंध कायदा १९८६ व बाल हक्क संरक्षण आयोग कायदा २००५ या कायद्यांबाबत श्री. गिरवलकर यांनी यावेळी माहिती दिली.
