तडव ऽऽ सिवाचे का तडवऽऽऽ?
दिवाळीनंतर आमच्या गावात सुगीला सुरुवात होई. मग अनेक प्रकारचे फेरीवाले कोल्हाटी, डोंबारी आमच्या गावात येत. त्यांचा मुक्काम रिकाम्या झालेल्या गावालगतच्या आखारात असे. बऱ्यापैकी धड असलेल्या, अनेक ठिकाणी ठिगळं असलेल्या कपड्यांची ती पालं मांडत. त्यांची पाल पाहायला ही!! सारी पोरासोरांची नि माणसांची गर्दी! कुणी त्यांच्या भाषेला, कुणी त्यांच्या स्वयंपाकाला तर कुणी त्यांच्या त्या कपड्यांच्या पालांना (घरांना) हसत. एकंदरीत काय तर कोल्हाटी, डोंबारी म्हणजे गाववाल्यांच्या चेष्टेचा विषय. त्यांची गाढव असायची. त्या गाढवावरच त्यांचा संसार आणि लहान मुले वाहून आणलेली असायची.
अगोदरच्या दिवशी सायंकाळी ही माणसे आखरात त्यांचे तंबू ठोकत आणि गाढवांना चरायला मोकळे सोडून देत. त्यांच्या बायका आजूबाजूच्या काटक्या जमा करीत व तीन दगडांची चूल मांडून त्यावर स्वयंपाक करीत. सर्व उघड्यावरच. कशाला आडोसा म्हणून नाहीच. अंघोळीचा प्रश्नच उद्भवत नसे. कसेबसे झोपायला ती फाटक्या कपड्यांची झोपडी असे. दुसऱ्या दिवशी सूर्य थोडा वर येत नाही तोच त्यांच्या बायका काखेत लहानशा मुलांना घेऊन दारोदार भीक मागायला सज्ज होत. भीक मागताना अगदी काकूळतीला येऊन म्हणत, “बाळूची मायवो भाकर देवोऽऽऽ राधाची माय वो भाकर देवोऽऽऽ” गावातली सगळी लहान मुलं त्यांच्याबरोबरच हिंडायची. उगीच. नी त्यांच्या त्या भीक मागण्याच्या पद्धतीला हसायची. काही बायका लेकुरवाळ्यांना भिकेच्या मोबदल्यात लहान मुलांच्या हातातील काळ्या पांढऱ्या मण्यांच्या बांगड्या, काळा दोरा किंवा मुरुड शेंगा देत. भीक मागणाऱ्या या स्त्रिया तशा तरण्याताठ्या असत. पण या तरण्याताठ्या नि देखण्या असूनही भिक का मागतात हा प्रश्न मला माझ्या लहानपणी पडत असे. पण त्याचे उत्तर मला मिळत नव्हते. त्यांच्या त्या मुलांना कडेवर घेऊन उर फुटेस्तोवर भीक मागत फिरायचे आणि घरधनीणला तिची दया आली तरच भीक मिळायची .भाकरीचा तुकडा नाहीतर मुठभर पीठ. हे सगळं पाहून मनात कालवाकालव व्हायची. पण कोडं सुटत नव्हतं. त्यांची माणसे मनात आलं तर काम धंदा करीत. हा धंदा न चालणाराच असायचा. गावातल्या लोकांचे तडव शिवण्याचा. तडव काही प्रत्येकाच्या घरी नसायचे. श्रीमंत शेतकरी किंवा पाटील यांच्याच घरी ते असायचे. पाहुण्यारावळ्यांना अंथरण्यासाठी किंवा कापसाच्या गाड्या भरल्यानंतर बाजारात कापूस विक्रीस नेतांना तो सांडू नये म्हणून गाडीला चहू कडून तडव लावला जायचा. हा तडव अनेक वर्षे वापरला जाई. तो जाड अशा दोऱ्यांनी घट्ट विणलेला असायचा. एक किंवा दोन माणसांना सहजासहजी न उचलण्या इतपत त्याचे वजन असायचे. अनेक वर्ष वापरल्यानंतर तो फाटत असे. अर्थातच त्याला छोट्या सुईने शिवणे शक्य नसे. तशाच प्रकारचा दोरा आणि दाभणाच्या साह्याने त्याला शिवावे लागे. गावात येणाऱ्या या भटक्या लोकांकडे तसा दोरा नि दाभण असायचा. हे साहित्य डोंबारी आपल्या धोकटीत टाकून ते बखोटीला टांगत आणि त्यांच्या त्या किडूक मिडूक साहित्यातील जुनाट पत्र्याच्या पेटीतील फार जपून ठेवलेलं पांढरशुभ्र धोतर नेसत. तसाच ठेवणीतला काळा कोट, पांढरी किंवा फरची टोपी घालत. धोतर बहुदा ते एक टांगीच नेसायचे. उजव्या हातात धोतराचा सोगा, बखोटीला किंवा पाठीला दाभण नि दोऱ्याची धोकटी घेऊन हे लोक ओरडीत, “तडवऽऽ सिवाचे का तडवऽऽऽ?” तडव सिवाचे का तडव ऽऽऽ? मला त्या हेल काढलेल्या आवाजाचे विलक्षण वेड! आमच्या घरी तडव होता पण तो फार जुना व फाटलाही होता. आम्ही सर्व भावंडे तो घरात भिंतीच्या या कडेपासून तर त्या कडेपर्यंत अंथरायचो व त्यावर झोपायचो. या तडव शिवणाऱ्या कडून तो तडव शिवून घ्यावा असे मला मनापासून वाटे. केवळ तो आवाज ऐकण्यासाठी मी बाबांना म्हणायची, “बाबा, आपला तडव शिवा ना! तडव शिवणाऱ्याला मोबदल्या देण्याइतपत आमच्याकडे धान्य नसे. त्याला बोलावून घेणे म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्र अशी आमची परिस्थिती होती. म्हणून बाबा माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत. पण मला त्याची कल्पना नव्हती. बाबा माझी गोष्ट कानावर घेत नाहीत हे पाहून मी एक दिवस फाटलेलल्या तडवाच्या छिद्रात हात घालून तो अधिक फाडण्याचा प्रयत्न केला. छिद्र अधिक मोठे झाले. म्हणजे तडव बराच फाटला होता. आता तडव शिवणे भागच होते. दुसऱ्या दिवशी तडव ऽऽसिवाचे का तडवऽऽऽ हा लयबद्ध आवाज आमच्या घराच्या दिशेने येऊ लागला तेव्हा मला अतोनात आनंद झाला.
असाच लहानपणी आणखी एक आवाज मला खूप आवडायचा आमच्या गावचा बाजार शुक्रवारी भरे. त्या दिवशी आमच्या गावात एक फकीर येई. दिवसभर भाजी, खाऊ विक्रेत्यांकडून तो भीक जमा करी आणि रात्री दर्ग्यात झोपून दुसऱ्याच दिवशी गावात पुन्हा भीक मागायला हिंडत असे शनिवारी कोवळे ऊन पडते ना पडते तोच या फकीराची ललकारी ऐकू येई. भल्लाव….हैंया…माई जरा हो आंऽऽऽऽ. या ललकारीचा ठेका वेगळाच असे. पहाटे ज्याप्रमाणे मुस्लिमांचे मौला अजान देतात तसाच काहीसा हा आवाज असे. हिवाळ्यात आमच्या दारात कोवळी उन्हाची किरणे पडत. त्या उन्हात आई आम्हाला अभ्यासाला बसायला सांगायची व स्वतः घर अंगण सारवायला लागायची. मग आम्ही आईचे लुगडे चौपदरी करून किंवा बाबांचे धोतर दुहेरी करून अंगावर घ्यायचो. सूर्याकडे तोंड करून पुस्तक वाचायचो. थोडासा अभ्यास होत नाही तोच या फकीराचा आवाज अचानकच कानावर पडायचा. भल्लाव हैंय्या माई जरा हो आंऽऽऽ. हाही आवाज मला फार आवडायचा. पण तो नेमके काय म्हणतो ते मुळीच समजायचे नाही. आमचा ग्रामीण भाग. त्यात हिंदी औषधालाही नाही. गावातल्या मुसलमानांचे शब्द कधीमधी कानावर पडत पण हा बाबा (फकीर) पीठ म्हणत नाही, भाकर म्हणत नाही ,लोक याला भिक घालतात तरी कशी? हा माझ्या बालमनाला पडलेला प्रश्न. बर त्या फकिराला तरी कसे विचारायचे तू काय म्हणतोस ते? घरात कुणालाही ते विचारणे वेडेपणाचे होते. आणि उत्तर तरी कोणाकडे होते माझ्या या प्रश्नाचे? माझा थोरला भाऊ तर आमच्याशी बोलायला नाकच मुरडे. पण प्रत्येक शनिवारी फकीराचा हा आवाज मला हैराण करून सोडत असे. मग मीही फकीर आमच्या दारातून निघून गेल्यानंतर त्याची नक्कल करीत असे. लोक माझ्या त्या कृतीला हसत पण तो काय म्हणतो हा प्रश्न कुणालाच पडलेला नसायचा. मी मात्र शनिवारी त्या फकीराची वाट पाहायची. त्याच्या त्या ललकारीचे शब्द मोठेपणीसुद्धा माझ्या कानात घुमतच राहिले माझ्या महाविद्यालयीन जीवनात मी त्या ललकारीचा अर्थ शोधत होते पण मला नाही सापडला. वयाच्या 42-43 व्या वर्षी एकदा मी या फकीराची गोष्ट माझ्या कन्येला सांगत होते. आणि मला युरेका सापडल्याचा साक्षात्कार झाला. मला त्या ललकारीतील बोल
समजले. “भला होगा माई तेरा हो” असे ते शब्द होते. फकीर असल्यामुळे तो भीक मागणारा कदाचित उर्दू बोलत असावा पण भीक मागण्याच्या तर्हा वेगवेगळ्या. तसेच तो फकीरही भला शब्दातील ला या अक्षरावर जोर देऊन त्याचा उच्चार भल्ला असा करायचा आणि “होगा माई तेरा हो” हे शब्द अनुनासिक स्वरात म्हटल्यामुळे ते मला “माईं जरा हों…असे ऐकू यायचे. भल्लाव हैय्या माई जरा हो असे हे अर्थहीन का होईना पण ते शब्द, त्या शब्दांची ललकारी मनापर्यंत भिडायची व मला आवडायची. आजही मला भला होगा माई तेरा हो या अर्थभरीत शब्दापेक्षा भल्लाव हैंया माई जरा हों आंऽऽऽऽ हेच शब्द आवडतात. आता कधीतरी शुक्रवारी गावात जाण्याचा योग आला तर मला आजही ती भल्लाव हैंयाची आठवण येते. पण आता दारात कोवळं ऊन येत नाही. कारण अंगण चारही बाजूंनी सिमेंटच्या भिंतीने बंदिस्त केले आहे. आणि घर अंगण सारवणारे माझ्या माऊलीचे ते हातही दिसत नाहीत.
प्रा. उषा काळे
मो. 9890562820
