लातुरात संविधान दिन उत्साहात साजरा, भव्य ५०० फूट तिरंगा रॅली संपन्न
लातूर,दि. (२६), प्रतिनिधी:
भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्ष आणि संविधान दिना निमित्त संविधान सन्मान समिती, यांच्या वतीने शहरात भव्य ५०० फूट लांबीच्या संविधान सन्मान तिरंगा ध्वज रॅलीचे आयोजन करण्यात आले. पु. भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली ही रॅली उत्साहात आणि देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत भरलेली होती.
रॅलीचा शुभारंभ भिक्खू पय्यानंद थेरो, भंते बोधिराज, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, महानगरपालिकेच्या आयुक्त मानसी मीना, तसेच समाज कल्याण उपायुक्त अविनाश देवसटवार सह आयुक्त यादव कांबळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. रॅलीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून होत संविधान चौक येथे समारोप करण्यात आला.
शहरातील विविध विद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी पथनाट्य, झांज पथक, तसेच महापुरुषांच्या वेशभूषेत आकर्षक प्रात्यक्षिके सादर करून रॅलीला विशेष रंगत आणली. ५०० फूट तिरंग्याखाली निघालेली ही रॅली नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती.
संविधान चौकात बोलताना पु.भिक्खू पय्यानंद थेरो म्हणाले,
या अमृत महोत्सवी वर्षात आपण सर्वांनी एकच संकल्प करायला हवा भारतीय संविधानावरील निष्ठा कधीही ढळू देणार नाही, संविधानातील मूल्ये आपल्या आचरणात आणू, आणि प्रत्येक नागरिकापर्यंत संविधानाची जागृती पोहोचवू.
शासनानेही संविधान वर्ष अधिक व्यापक पातळीवर जनसहभागातून साजरे करावे, संविधानाचे महत्त्व घरोघरी पोहोचवावे व युवकांना लोकशाही मूल्यांची भक्कम जाण निर्माण करून द्यावी. आजची रॅली हा त्याच जागृतीचा एक सुंदर प्रारंभ आहे. आपण सर्वजण संविधानाचे संरक्षक आहोत आणि ही जबाबदारी अभिमानाने पार पाडली पाहिजे.”
रॅलीचा समारोप संविधान चौकात संविधान उद्देशिका वाचन आणि राष्ट्रगीताने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यु. डी. गायकवाड यांनी केले, तर आभार निलेश बनसोडे यांनी मानले.
या रॅलीमध्ये कालिदास माने,बसवंत उबाळे, सुशील चिकटे, डॉ विजय अजनीकर, अशोक देडे, शोभा सोनकांबळे, आशा चिकटे,विशाल वाहुळे, प्रा सतिश कांबळे, उत्तम कांबळे, सुरेश सोनकांबळे मिलिंद धावारे, आदीजन शहरातील विविध क्षेत्रातील विविध शाळांचे विद्यार्थी, संविधानप्रेमी नागरिक, तसेच महाविहार धम्मसेवक ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
