17/03/2026
IMG-20251220-WA0114

पीएचडी संशोधक थेट चुलीकडे……

महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभाग हा तसा पूर्वीपासूनच इतर विभागापेक्षा मागासलेला म्हणून ओळखला जातो. येथे पूर्वी शैक्षणिक मागासलेपण होते. मराठवाड्यातील सर्वच जिल्हे सर्वच बाबतीत मागासलेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मिलिंद महाविद्यालयाची स्थापन केली. त्यावेळी मराठवाडा व विदर्भातील कांही जिल्हे या महाविद्यालयाने सुशिक्षित केले. हे विसरून चालणार नाही. पण आता बऱ्यापैकी इतर जिल्ह्याच्या मानाने लातूर जिल्ह्याने शैक्षणिक प्रगती साधली आहे. सबंध महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यतील विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती केल्याचे चित्र आपण पाहत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रभर लातूर जिल्ह्याने “लातूर पॅटर्नच्या” नावाखाली एक वेगळा शैक्षणिक ठसा निर्माण केला आहे. जे लातूर जिल्ह्याला जमलं ते इतरांना जमवता आलं नाही, असे म्हणले तरी कांही वावगे ठरणार नाही. कारण संपूर्ण महाराष्ट्राचा ओघ अजूनही लातूरकडे असल्याचे चित्र आपण पाहत आहोत. असो,

काल मला कांही कामानिमित्त मित्रासोबत अहमदपूरला जावे लागले. तसे अहमदपूर हे तालुक्याचे ठिकाण आहे. हा तालुका लातूर जिल्ह्यतील दहा तालुक्यांपैकी एक. अहमदपूर बस स्थानकाच्या मुख्य रस्त्यासमोरून गाडी जात असताना सहज एका हॉटेलचे नामफलक माझी नजर पडली. “पीएचडी ग्रॅज्युएट खिचडी व वडापाव सेंटर” असे नामफलक वाचण्यात आले. पीएचडी ग्रॅज्युएट नाव वाचल्यामुळे मी मित्राला गाडी बाजूला घेऊन थांबवण्यास विनंती केली आणि गाडीतून उतरून मी त्या हॉटेलच्या दिशेने निघालो. हॉटेलच्या नामफलक वाचून मला आनंद वाटला, त्या हॉटेलचे नामफलक वाचले, डॉ. वसंत लामतुरे असे त्यांचे नाव. शैक्षणिक पात्रता एम.ए.(राज्यशास्त्र); एम.ए.(हिंदी); बी. एड.; सेट; पीएचडी. ही पात्रता वाचून मी विचारात पडलो. त्यांची भेट घ्यावी म्हणून विचारणा केली असता, मालक कामानिमित्त बाहेर गावी गेल्याचे कामगारांनी सांगितले. (भविष्यात त्यांची भेट घेऊन मुलाखत घेऊन). मग मात्र माझ्या डोक्यात अनेक प्रश्न निर्माण होत होते. हॉटेलच सुरू करायचे होते तर त्यांना एवढे उच्च शिक्षण घेण्याची गरज का पडली? यांना शिक्षण घेत असताना किती अडचणींना तोंड द्यावे लागले असेल? किती हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या असतील? असे अनेक प्रश्न उपस्थित राहू लागले. माझ्या बालपणापासून ते माझे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. एक संशोधक संशोधन करुन थेट चुलीकडे जाऊ शकतो यावर माझा विश्वास बसत नव्हता. कारण “संशोधनाकडून चुलीकडे” हा मार्ग बुद्धीला पटणारा नव्हता.

“विद्या विनयेन शोभते” असे आपण म्हणतो. शिक्षण म्हणजे व्यक्तीचा, समाजाचा आणि राष्ट्राचा सर्वांगीण विकास. विशेषतः पीएचडीसारखी सर्वोच्च शैक्षणिक पदवी म्हणजे ज्ञान, संशोधन, चिंतन आणि समाजाला दिशा देण्याची क्षमता. मात्र आजची वास्तव परिस्थिती अत्यंत विदारक आहे. पीएचडी झालेला उच्च शिक्षित तरुण उदरनिर्वाहासाठी छोटे हॉटेल, पानटपरी किंवा किरकोळ व्यवसाय चालवत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. ही केवळ एका तरुणाची वैयक्तिक शोककथा नसून संपूर्ण उच्च शिक्षण व्यवस्थेच्या अपयशाचा आरसा आहे.

पीएचडी ही केवळ पदवी नसून अनेक वर्षांचा कठोर अभ्यास, संशोधन, प्रयोग, लेखन आणि बौद्धिक मेहनतीचा परिपाक असतो. विद्यार्थी आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे संशोधनासाठी देतो. आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या, अपुरी फेलोशिप, मानसिक ताणतणाव यांवर मात करत तो प्रबंध पूर्ण करतो. समाजाच्या प्रगतीसाठी नवे विचार, नवे संशोधन देणे हेच त्याचे अंतिम ध्येय असते.

पण, पदवी मिळाल्यानंतरचे कटू वास्तव कांही वेगळेच आहे. पीएचडी पूर्ण झाल्यानंतर या तरुणासमोर रोजगाराच्या संधींचे दरवाजे उघडतील, अशी अपेक्षा असते. मात्र प्रत्यक्षात चित्र उलटेच दिसत आहे.

विद्यापीठांमधील प्राध्यापक पदे वर्षानुवर्षे रिक्त, कंत्राटी व तात्पुरत्या नोकऱ्या, अल्प मानधनावर अतिथी प्राध्यापक म्हणून काम, संशोधन संस्थांतील मर्यादित जागा, खासगी क्षेत्रात पीएचडीला अपेक्षित मान्यता नाही, या सर्व कारणांमुळे उच्च शिक्षित तरुण बेरोजगारीच्या गर्तेत सापडतो.

जेव्हा पीएचडीधारक तरुण छोटे हॉटेल चालवतो, तेव्हा तो शिक्षणाचा अवमान करतो म्हणून नव्हे, तर पोटाची भूक भागवण्यासाठी जमेल ते असे व्यवसाय करतो. कुटुंबाचा उदरनिर्वाह, कर्जाची परतफेड, सामाजिक जबाबदाऱ्या यामुळे त्याला कोणतेही काम छोटे वाटत नाही. मात्र समाजाला प्रश्न पडतो—इतके शिक्षण घेऊनही शेवटी हेच करावे लागते का?

हा प्रश्न व्यक्तीचा नसून व्यवस्थेचा आहे. उच्च शिक्षण आणि रोजगार यामध्ये समन्वय नाही. संशोधनाला सामाजिक व आर्थिक महत्त्व दिले जात नाही. धोरणे कागदावर राहतात, अंमलबजावणी होत नाही. गुणवत्तेपेक्षा ओळखी व राजकारणाला प्राधान्य दिले जाते. यामुळे शिक्षणाचा उद्देशच हरवून बसला आहे.

पीएचडीधारक तरुण हॉटेल चालवत असल्याचे चित्र पाहून इतर तरुणांच्या मनात निराशा निर्माण होते. “शिकून काय उपयोग?” असा प्रश्न उभा राहतो. संशोधन, विज्ञान, समाजशास्त्र, साहित्य यांसारख्या क्षेत्रांकडे जाण्याची इच्छा कमी होत आहे. हा प्रकार देशाच्या बौद्धिक भांडवलासाठी घातक आहे.

समाज एकीकडे शिक्षणाचे महत्त्व सांगतो, तर दुसरीकडे उच्च शिक्षित बेरोजगाराकडे सहानुभूतीऐवजी उपहासाने पाहतो. शिक्षणाला प्रतिष्ठा तेव्हाच मिळेल, जेव्हा शिक्षणातून सन्मानजनक रोजगार मिळेल.

यावर ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. पीएचडीधारकांसाठी स्वतंत्र रोजगार धोरण. विद्यापीठांतील रिक्त पदांची तातडीने भरती. उद्योग–शिक्षण संस्थांमधील समन्वय वाढवणे. संशोधनाला आर्थिक पाठबळ व सामाजिक मान्यता, कंत्राटी पद्धतीऐवजी स्थायी संधी निर्माण करणे.

पीएचडी झालेला तरुण हॉटेल चालवतो, ही बाब त्याच्या कष्टांची लाज नसून व्यवस्थेच्या अपयशाची शोकांतिका आहे. जर हे वास्तव बदलले नाही, तर उच्च शिक्षण म्हणजे केवळ प्रमाणपत्रांचा ढीग ठरेल आणि संशोधनाची परंपरा नष्ट होईल. शिक्षणाला अर्थ, सन्मान आणि भविष्य देण्याची जबाबदारी शासन, संस्था आणि समाज या सर्वांची आहे. अन्यथा “शिका, संघर्ष करा आणि शेवटी तडजोड करा” हीच उच्च शिक्षणाची नवी ओळख बनून राहील.

उच्चशिक्षित पीएचडी धारकाला टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी, संसारिक जीवनाचा गाडा हाकण्यासाठी, संशोधनाकडून चुलीकडे वळावे लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यात सरकारचे खूप मोठे अपयश आहे. शेवटी जात्यांध आणि धर्मांध शक्तीला खतपाणी घालणाऱ्या सरकारला उच्च शिक्षणाचे महत्त्व कधी समजणार? महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्रीच फेलोशिप साठी एकाच घरातील चार पाच जण पीएचडी करत आहेत म्हणून कांगावा करत आहे. या उपमुख्यमंत्र्याला कोण सांगणार की, शिक्षण घेणे हा संविधानिक अधिकार आहे. मग एकाच घरातील सर्वजण पण शिकू शकतात. जसे, एकाच घरातील सर्वच राजकारणात जावू शकतात. पण, या अडाणचोटांना संविधान कोण शिकवणार?  बुद्धिजीवी वर्गाने याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आम्हाला काय करायचे? आमचा काय संबंध येतो? असे म्हणून गप्प बसाल तर येणारा काळ तुमच्या सह तुमच्या पिढीला सोडणार नाही. त्यामुळे याचा विचार समाजातील बुद्धिजीवी वर्गाने वेळेत करायला हवा. गाडी, माडी आणि बायकोची साडी यातच आपली नौकरी समर्पित करणाऱ्यांनी, चवीला लोणचे खाल्ल्यासारखे तोंडसुख घेऊन चळवळीच्या आणि परिवर्तनाच्या गप्पा मारणे व्यर्थच आहे.

राहुल गायकवाड

लातूर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. www.samtapatra.online Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!