माजलगाव/ प्रतिनिधी-
आदर्श बुद्ध विहारांना मिळणार अष्टधातूंच्या बुद्ध मूर्त्यांचे दान
संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘चलो बुद्ध की ओर’ अभियानाअंतर्गत परित्राण बुद्धिस्ट फाउंडेशनच्या वतीने युवा नेते अॅड. संदीप ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे माजलगाव येथे आयोजन करण्यात आले आहे.
३० ऑक्टोबर २०२५ रोजी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील एमसीसी क्रिकेट मैदानावर आयोजित सोहळ्यात हजारोंच्या संख्येने धम्मबांधव उपस्थित राहतील, अशी माहिती फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे. सोहळ्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनासह जिल्ह्यातील आदर्श बुद्ध विहारांना अष्टधातुंच्या बुद्ध मूर्त्यांचे दान करण्यात येणार आहे.
या सोहळ्यात श्रीलंकेतील डॉ. भदंत अग्गराहेरा कश्शप थेरो तसेच उपासिका आयुष्यमती कौसल्या विक्रमसिंघे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे ‘व्हीआयपी राहणं’ फेम साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण यांच्या समाजप्रबोधन आणि भीम गीत गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी माजी न्यायमूर्ती सी.एल.थूल, सिने अभिनेते गगन मलीक, भदंत पय्याबोद्धी थेरो, आंबेडकरी रॅपर विपीन तातड यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमात धम्म चळवळ, आंबेडकरी आंदोलनातील ज्येष्ठ नेते तसेच कार्यकर्त्यांना विशेष सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील आंबेडकरी सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर्सना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात धम्मदेसना देण्यात येईल. या कार्यक्रमास विदर्भातून हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
धम्मचक्रप्रवर्तन सोहळ्याचा मुख्य उद्देश समाजप्रबोधन, सामाजिक एकता आणि बौद्ध तत्वज्ञानाचा प्रसार हा आहे. समाजात विषमता, अंधश्रद्धा आणि द्वेषभावना वाढताना दिसत आहे. त्यामुळे भगवान बुद्धांच्या करुणा, प्रज्ञा आणि समत्वाच्या तत्त्वांचा प्रसार होणे ही काळाची गरज आहे. धम्म हे केवळ धार्मिक साधन नाही तर सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे.
बुद्धविहार हे समाजातील शिक्षण, संस्कार आणि प्रबोधनाचे केंद्र बनावेत. तसेच सर्वसामान्यांना जागरूक करणे, त्यांना शिक्षण, नीतिमत्ता आणि संवेदनशीलतेच्या मार्गावर आणणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदर्श बुद्धविहारांना अष्टधातूंच्या बुद्धमूर्तींचे दान करण्यात येणार आहे. बुद्धमूर्ती हे श्रद्धेचे प्रतीक आहे; परंतु त्यामागील तत्त्वज्ञान म्हणजे करुणा, मैत्री आणि समता हे येणाऱ्या काळात समाजमनावर बिंबवण्याचे काम फौंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमास बौद्ध बांधवानी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवा नेते अॅड. संदीप ताजने यांनी केले आहे.
