स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विकासाच्या मुद्दावर लढवण्याचे आवाहन
मुंबई- २५ ऑक्टो.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून राज्यातील राजकीय पक्षांची जमिनीवरील ताकद आणि समाजाशी असलेले नाते स्पष्ट होईल. मात्र, राज्यात काही राजकीय पक्षांकडून ओबीसी विरुद्ध मराठा असा कृत्रिम संघर्ष पेटवण्याचे काम करण्यात आले आहे. आगामी निवडणुकीत जनता अशा प्रवृत्तीला मतदानातून प्रत्युत्तर देईल, असा ठाम विश्वास इंडिया अगेन्स्ट करप्शन आणि ओबीसी एकजूट परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी (ता.२४) व्यक्त केला.
आरक्षण हा संवेदनशील आणि घटनात्मक अधिकारांशी निगडित विषय आहे. मराठा समाजाचे प्रश्न न्याय्य आहेत, परंतु या प्रश्नावरून समाजात फूट पाडण्याचे किंवा ओबीसी समाजाला विरोधात उभे करण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. सर्व समाजघटकांना शांततेने आणि घटनात्मक मार्गाने तोडगा शोधावा लागेल, असे आवाहन पाटील यांनी केले. राज्यातील अंदाजे ५२ टक्के ओबीसी लोकसंख्या आणि ३३ टक्के मराठा समाज या दोन प्रमुख घटकांमध्ये ऐक्य राहणे हे महाराष्ट्राच्या सामाजिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पाटील म्हणाले.
आगामी निवडणुका या जातीय समीकरणांवर नव्हे, तर विकास, पारदर्शकता आणि प्रामाणिक प्रशासनावर लढल्या जाव्यात. आयएसी व ओबीसी एकजूट परिषदेच्या माध्यमातून जनजागृती मोहिमा राबवून समाजात सलोखा टिकवण्याचे प्रयत्न केले जातील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा आदर करत, सर्व समाजघटकांना न्याय मिळेल अशा मार्गाने पुढे जाणे अपेक्षित आहे. राज्यातील जनतेचे सरकारवर विश्वास असल्याचे पाटील यांनी नमूद केले. सरकारच्या प्रयत्नांना सकारात्मक सहकार्य देण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, राजकारणासाठी समाजात तणाव निर्माण करणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही, असेही पाटील यांनी अधोरेखित केले.
|
|
