December 8, 2025
Jyoti
                     पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांवरील अत्याचार, अन्याय, तिला कुटुंबात दिली जाणारी  दुय्यमत्त्वाची वागणूक, ही स्त्रियांना माणूस न समजणारी मनुवादी व्यवस्था आहे. असे आपण वर्षानुवर्षे वर्तमानपत्रातून वाचत आलो आहोत, याचे प्रतिबिंब समाजामध्ये पाहत आहोत. कित्येक महिला अनुभवत आहेत. मुलीला शिकण्याचा हक्क सगळ्यांनी दिला पण शिकून विचार मांडण्याचा, चुकीच्या रूढींना उत्तर देण्याचा हक्क कोणी दिलाच नाही. तिच्या संघर्षात सगळ्यांची सहनभूती  मिळते. पण जेव्हा ती स्वतःच्या हक्कासाठी उभी राहते, तेव्हा तिच्या पाठीशी कोणीच नसते. हे स्वातंत्र्य, गुलामीपेक्षा कमी नाही. मात्र हे जरी सत्य असले तरीही वर्तमान काळामध्ये अनेक मोठ्या शहरांमध्ये महिलांचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक स्तर उंचावलेला दिसत असताना सुद्धा अनेक महिलांकडून कायद्याचा गैरवापर होताना सर्रास दिसत आहे. यामध्ये अनेक पुरुषांवर महिलांकडून अन्याय होताना दिसतो. हे सत्य आपल्याला स्वीकारावे लागेल, नाकारून चालणार नाही . 
                   यामध्ये कुटुंब व्यवस्थेसाठी स्त्री व पुरुष एकमेकांसाठी पूरक आहेत हा नैसर्गिक सिद्धांत समाजाकडून डावलल्याचा अनुभव येतो. माणूस म्हणून एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांचा आधार बनणे गरजेचे आहे. यासाठी नैतिक मूल्यांचे शिक्षण हे कौटुंबिक पातळीवर देणे गरजेचे आहे. पण तसे होताना दिसत नाही. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आजची  पीढी ही भौतिक वादाकडे झुकलेली दिसून येत आहे. यामध्ये कुठेतरी नैतिक आचरण कमी होताना दिसते आहे. याचा परिणाम कुटुंब व्यवस्थेवर झाल्याचा दिसून येतो. हुंडाबळी कायद्याअंतर्गत अनेक पुरुषांना खोटे गुन्हे दाखल करुन अडकवल्याचे चित्र दिसत आहे. तेच अनेक महिलांकडून कायद्याचा गैरवापर करून लग्नानंतर थोड्याच दिवसात घटस्फोटाची मागणी करून त्या पुरुषाच्या मालमत्तेवर दावा दाखल केला जातो. मग प्रश्न असा उभा राहतो की नक्की हे लग्न म्हणजे भावनिक, कौटुंबिक, सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी आहे की एकमेकांना दुय्यमत्त्वाची वागणूक देण्यासाठी आहे? महिलांकडून कायद्यांचा गैरवापर वाढल्यामुळे पुढे जाऊन पुरुषांसाठी महिला आयोगाप्रमाणेच पुरुष आयोग स्थापन करणे काळाची गरज भासणार आहे. यात कांही शंका नाही असे मला वाटते. यासाठी मुलांना कौटुंबिक पातळीवर तसेच शैक्षणिक पातळीवर जागृत करणे आज काळाची गरज आहे. कुटुंब हा समाजाचा मूलभूत घटक आहे. 
                   भारतीय समाज व्यवस्था ही कुटुंब प्रधान व्यवस्था असताना, परकीय देशातील संस्कृतीचा भारतामध्ये ऊहापोह करणे, त्या अनुषंगाने कायद्यामध्ये बदल करणे हे सामाजिक आरोग्यासाठी योग्य की अयोग्य याचा विचार होणे पण गरजेचे आहे. सध्याचा तरुण वर्ग चंगळवादाकडे झुकलेला दिसत आहे. कुटुंबामध्ये एकमेकांचे वेगवेगळ्या पातळीवर शोषण होताना दिसत आहे. लग्नानंतर अनेक कुटुंबामध्ये मुलीच्या माहेरील लोकांचे मुलीला आठवणीच्या नावाखाली रोजच फोन करून चुकीचे सल्ले देऊन, त्या मुलीचा संसार तोडण्याचे काम होताना दिसते. तिच्या अडचणीच्या काळात तिच्या सासरच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही गोष्ट वेगळी मात्र रोजच त्यांच्या घरातील छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये दखल देणे चुकीचे आहे असे मला वाटते.  माहेरील लोकांच्या अशा वागण्याने त्या मुलीचा सासरकडील नात्यांची भावनिक नाळ तयार होण्या अगोदरच दोन कुटुंबाबाबत गैरसमज निर्माण होऊन नाते तुटून जात आहेत. याचे गांभीर्य आईवडिलांनी ठेवणे गरजेचे आहे. सध्याची कुटुंब व्यवस्था खिळखिळीत होण्यामागे अशी अनेक वैयक्तिक, सामाजिक कारणे आहेत. त्याचबरोबर व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कायद्यात केलेले बदल हेही तितकेच घातक आहे. कारण समाजाकडून अनेक कायद्यांचा दुरुपयोग होताना सर्रास दिसतो आहे. भविष्यात याचे समाजावर दूरगामी विपरीत परिणाम होणार आहेत. त्यासाठी समाजामध्ये नैतिक मूल्यांचे शिक्षण हे कौटुंबिक शैक्षणिक पातळीवर होणे गरजेचे आहे. 
                   कायदे बनवताना समाजाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहोत याचे भान कायदेतज्ञांनाही असावे. कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करत असताना पोलीस प्रशासनाने सुद्धा याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. मात्र पोलिसांकडूनही कित्येक निरापराध लोकांना अपराधी ठरवण्याचे काम होताना दिसते. आज समाजामध्ये नैतिकता लुप्त होते की काय असे भीतीदायक चित्र निर्माण झाले आहे. आज समाजाला संतांच्या आणि बुद्ध विचारांची गरज आहे. ती आचरणात आणण्याची गरज असताना, आजची तरुण पिढी आभासी जगामध्ये वावरताना दिसते आहे. ते समाजाच्या तसेच कुटुंबाच्या आरोग्यासाठी घातक आहे. व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर, कौटुंबिक आरोग्य आणि कौटुंबिक आरोग्यावर सामाजिक आरोग्य अवलंबून असते. भारतामध्ये अनेक महापुरुषांनी विषमतावादी समाजव्यवस्था बदलून समाजामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या सामाजिक मूल्यांचा आग्रह  धरला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही मूल्ये संविधानाच्या रुपाने सकल  भारतीयांना दिली आहेत. आज मात्र स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार होताना दिसत आहे. तरुण वर्गाने हे वेळीच ओळखून स्वतःच्या भावनिक विकासाबरोबरच सामाजिक विकास करणे गरजेचे आहे.    
               आजचा तरुण वर्ग हा अभासी जगात वावरताना दिसत आहे. आजचा तरुण वर्ग जरी तांत्रिक युगात स्वतःला हायटेक समजत असला तरीही तो कुठेतरी मानसिक तणावग्रस्त जगात वावरत आहे. हे वाढत गेल्यास भविष्यात अनेक मानसोपचार तज्ञांची आवश्यकता भासू शकते. तरुणांचे मानसिक आरोग्य, त्यांच्या आनंदाच्या आणि स्वातंत्र्याच्या संकल्पना या त्यांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या आहेत. याचा दूरगामी परिणाम सामाजिक आरोग्यावर निर्माण होणार आहे. त्यासाठी त्यांनी निसर्गाच्या विरोधात जाऊन, नैसर्गिक नियमांना डावलून आचरण करणे बंद करणे काळाची गरज आहे.
  
ज्योती चाकणकर, पुणे
      एम. ए. पालि

3 thoughts on “भारतीय कुटुंब व्यवस्थेची दशा आणि दिशा

  1. आपका यह लेख बहुत ही सुंदर लिखा गया है, जो बहुत ही बेहतरीन और गहन जानकारी प्रदान करता है। यह लोगों के बीच जागरूकता लाएगा।
    आपके इस किए गए कठिन परिश्रम और ज्ञानवर्धक विचार रखने के लिए आपको शुभकामनाएं देता हूं।

  2. Your article in today’s Samtapatra is very precious which throws light on injustice with wonen. Similarly how the parents of women are responsible to destroy and disturb her family after marriage. This point is very important. Nowadays because of mobile married girls keep contact continineous with their mothers and tell minute things them which become responsible to happen clash between two families. The whole article is very nice. Congratulations Dear Jyoti .All the best for your future writing.

  3. सुदंर विवेचन. मानसोपचाराची गरज केवळ नविन पिढीलाच नव्हे तर सर्वांनाच पडेल अशी स्थिती आहे. बुद्धाशिवाय पर्याय नाही.

Leave a Reply to Siddharth Labhane Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. www.samtapatra.online Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!