आभाळ पेलणारी माणसे……
“या सीटवर बसा मॅडम” मला सिटी बस मधला एक प्रवासी नम्रतेने म्हणाला. मी डेक्कन जिमखान्या वरून
हडपसर कडे जाणाऱ्या बस मध्ये बसली होती. सायंकाळी सहा वाजता आमची बालभारती ची मिटिंग
संपली आणि आम्ही आपापल्या घरट्याकडे जाण्यास निघालो. प्रत्येक बस स्टॉप वर प्रवाशांची ही गर्दी!
प्रत्येक जण आपापल्या बसच्या वाटेकडे टक डोळे लावून उभा होता. दूरवर बसचा धुरळा दिसला की
नदीतील स्थिर पाण्यात दगड टाकल्याप्रमाणे बस स्टॉप वरील प्रवाशांची गर्दी विस्कळीत होई. सर्व प्रवासी
उठून उभे रहात. ज्यांची बस लागायची तो बस मध्ये चढत असे. आणि इतर हिरमुसले होऊन पुन्हा आपापल्या
जागी स्थानापन्न होत. किंवा उभेच राहत आपल्या बसची वाट पाहत. बसमध्ये चढल्यावर पुन्हा चिंतीत चेहरे!
बसमधील चित्र बस स्टॉपपेक्षाही भयानक! दोन्हीकडे सीटवर बसलेली मंडळी नशीबवानच! बस मध्ये
डावीकडे स्त्रियांसाठी तर उजवीकडे पुरुषांसाठी बसण्याची व्यवस्था केलेली. सीटवर बसलेल्या प्रत्येकाजवळ
बहुधा स्मार्टफोन होताच. त्यामुळे कानात हेडफोन घालून ते मोबाईल मधील गाण्याचा, मूवीचा, मेसेजचा
मनसोक्त आनंद लुटत आणि त्याच वेळेस उभे असलेल्या प्रवाशांना जणू काही तुरुंगात असल्याप्रमाणे
कैद्याची शिक्षा भोगावी लागत असे.
बसच्या त्या मधल्या स्पेसमध्ये किती म्हणून माणसे उभे राहावेत? त्याचा
सुमारच नव्हता. दाटीवाटीने वरच्या कड्यांना धरून हेलकावे खात ते प्रवास करीत होते. कुणाचे घर पंधरा
मिनिटांनी, कुणाचे अर्ध्या तासाने तर कुणाचे एक तासाने येणार होते. आणि तोपर्यंत उभे राहून तारेवरची
कसरत त्यांना करावी लागणार होती. बस स्टॉपवर बस थांबली की सीट जवळ उभी असणारी स्त्री किंवा
पुरुष प्रवासी मोठ्या आशेने सीटवरील प्रवाशाकडे पाहत असे. हा उतरतो की काय म्हणजे पटकन तिथे
आपल्याला बसता येईल या कल्पनेने. सीटवरील प्रवाशांनी थोडीशी हालचाल केली, बॅगेला किंवा पर्सला
हात घातला की उभा राहणारा प्रवासी अलर्ट होई. बसण्यासाठी. पण क्षणातच त्याची निराशा होई. कारण
सीटवरचा प्रवासी बॅगेतून पेन किंवा रुमाल काढत असे आणि सीटवर तसाच बसून राही. कारण तो त्याचा
स्टॉपच नसायचा.उभे राहणाऱ्या प्रवाशाचे पाय दुखून जात. नुसते पायच नव्हे तर सबंध शरीरच! कधी
ड्रायव्हर कचकन ब्रेक दाबत असे. तर प्रत्येक बस स्टॉप वर उतरणारे व चढणाऱ्या प्रवाशामुळे मागे पुढे
होण्यासाठी करावी लागणारी कसरत! कंडक्टर तिकीट काढायला येई तेव्हा तर भलतीच तारांबळ!
खिशातून पैसे काढायचे म्हटले तर केवढी कसरत ! चालत्या बसमधून, उभ्या गर्दीतून पॅन्टच्या खिशात हात
घालून पैसे किंवा पैशाचे पाकीट काढायचे व कंडक्टरच्या हातावर दहा किंवा वीस रुपये द्यायचे म्हणजे
दिव्यच! त्यातल्या त्यात स्त्री प्रवासासाठी तर ही बाब म्हणजे मोठेच खडतर काम! खांद्यावर लटकवलेल्या
पर्समधून, आतल्या कप्प्यातून पैसे काढायचे, तेही पर्सचे बटन काढून, एका हाताने अंगावरची ओढणी किंवा
पदर सावरायचा, दुसरा हात कसातरी पर्समध्ये घालायचा, तेवढ्यात मध्येच गाडीचा ब्रेक लागतो आणि
निराधार अवस्थेत त्या स्त्रीचा तोल जाऊन समोरच्या प्रवाशावर पडल्यासारखे झाले की त्या प्रवाशाची
शिव्याची लाखोली खायची! सगळे अवघडच! सर्व निमूटपणे ऐकायचं! तिथे तुमच्याबद्दल कुणालाच
सहानुभूती नसते. कारण प्रत्येकालाच घराची ओढ लागलेली असते. बहुतेकाने सहा ते आठ तास
ऑफिसमध्ये काम केलेले असते आणि प्रत्येकालाच घरात जाऊन निवांतपणे आराम करायचा असतो.
टीव्ही समोर थोडे बहुत मनोरंजन करून घ्यावयाचे असते. पण स्त्रियांना हे शक्य आहे? त्या आरामाचा
विचार करतात? नाही. त्यांना घरी जाऊन अगोदर घर आवरायचं असते.
खांद्यावरील पर्स कोपऱ्यात फेकून देऊन खांदा रिता केला तरी आता संपूर्ण घराचा भारच
अंगावर घ्यायचा असतो. पदर खोचून प्रथम ती किचनकडे वळते. घरात तिची पिले वाट पाहत असतात.
शाळेतून येऊन खेळण्याचा त्यांनी पसारा मांडलेला असतो. तो पसारा तिला आवरायचा असतो. धुणी
भांडीवाली येऊन गेलेली असेल तर ठीक नाहीतर आनंदात भरच! ती भांडी प्रथम तिला घासावी लागतात.
तोपर्यंत पती राजांना, घरात सासू-सासरे असतील तर त्यांना, मुलांना चहा किंवा काहीतरी खाऊ हवा
असतो. ते करतात तिचा विचार? नाही. बहुतेक घरात नाहीच. हाताच्या बोटावरील कांडे मोजण्याइतपत तसा
विचार करत असतील. नंतर स्वयंपाक, वाढणे आणि पुन्हा सगळी आवरावर करून उद्याच्या चिंतेत झोपणे.
लागत असेल तिला शांत झोप? सकाळी पुन्हा रोजचीच गडबड. सर्वांच्या आधी उठा. आंघोळीचे पाणी तयार
करा, मुलांच्या शाळेची तयारी, त्यांना डबे, डब्यात काय ही चिंता. मुलांना दररोज एक प्रकारचा मेनू नको
असतो. नवीन काय करायचे याची चिंता. पुन्हा सकाळचा चहा, स्वयंपाक आणि सर्वच काही. म्हणजे सकाळी
किमान तीन ते चार तास व सायंकाळी सुद्धा तेवढेच तास स्त्रियांना घरात दररोज जवळजवळ सहा तास
तरी उभे राहून काम करावे लागते. आणि कार्यालयात बैठे काम असेल तर ठीक नाहीतर शिक्षकी पेशात उभे
राहूनच शिकवावे लागते. अशा पार्श्वभूमीवर तिला बसमधून प्रवास करावा लागत असेल तर तिची अवस्था
काय होत असेल? पण एवढा विचार करायला, तिच्याबद्दल सहानुभूती बाळगायला कुणाला वेळ आहे?
किंबहुना त्याची गरजच काय? घरच्यांना नाही तर बाहेरच्यांना तरी काय फिकीर?
पण त्या दिवशी मला बस मध्ये असा एक सहृदयी प्रवासी भेटला. माझ्या वेदनावर फुंकर घालणारा.
घामाने डबडबलेल्या अंगावर वाऱ्याची थंडगार झुळूक लागावी तसे मला त्याचे बोलणे वाटले त्या दिवशी!
वयस्कर होता 65-70 च्या जवळपास. शिक्षकी पैशातून निवृत्त होऊन मला एक वर्षा झालेलं होतं.आणि
अकरावी बारावीचे अर्थशास्त्र लिहिण्यासाठी माझी नेमणूक झालेली होती. त्याच्या बालभारतीत मीटिंग
होत असत. महिन्यातून दोनदा तरी ह्या मीटिंग होत असत. तीन-चार दिवस प्रत्येक मीटिंग चालत असे. मी
कोल्हापुरातून पुण्यातील हडपसरला माझ्या मुलीकडे मुक्काम करीत असे आणि तिथून दररोज
बालभारतीत मीटिंगसाठी सिटी बसने जात असे. हडपसरच्या स्टॉप वर सकाळी साडेआठ ते नऊच्या
दरम्यान मी थांबत असे. तिथे प्रचंड गर्दी असायची प्रवाशांची. कोणी कोथरूड, स्वारगेट, मनपा (महानगर
पालिके)ला जाणारे असत. डेक्कन जिमखानापर्यंत जाणारी फक्त एकच बस असायची.111 नंबरची. ती
20- 25 मिनिटांनी येत असे. ती मिळावी म्हणून घरातून साडे दहाच्या मिटींगला मी दोन तास अगोदर घरातून
निघत असे. बसची फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे मनपात जाणारी प्रत्येकच बस खचून भरलेली असायची.
ती भेकराई नगरहून येत असे. त्यामुळे ती गच्च भरलेली असे.म्हणजे सीटवर बसायला वावच नाही. डेक्कन
जिमखाना येईपर्यंत पाऊण ते एक तास तरी उभे राहावे लागत असे. पाय भरून येत. पण पुण्याचे बहुतेक
लोक एकूणच बेदरकार! दुसऱ्याच्या वेदनांचा किमपीही विचार न करणारे! सीटवर बसणाऱ्या प्रवाशाला
कदापिही वाटत नाही की जवळ उभ्या असलेल्या वयस्कर स्त्री-पुरुषांना थोडा वेळ तरी बसू द्यावे व आपण
थोडा वेळ उभे राहावे. तरुण असो वा तरुणी, मध्यम असो वा वयस्कर एकदा त्याला सीट मिळाली की दीड
दोन तास तो मस्तपैकी खिशातील मोबाईल काढतो, कानाला हेडफोन लावतो आणि उभे राहणाऱ्या
प्रवाशाच्या जखमेवर मीठ चोळतो. अशा वेळेस जळफळाट होतो अंगाचा. कीवही येते त्यांची. आणि वाटते
हेच काय पुणे तेथे काय उणे? होय आहे तिथे उणे. माणुसकीची उणीवच आहे मुळी येथील लोकात.त्यांना
वयस्कर माणसाच्या वयाची किंवा त्यांच्या दुर्बलतेशी काहीही घेणेदेणे नसते. बसमध्ये दोन-तीन तास उभे
राहून प्रवास करणारे प्रवासी असतात तर त्यांच्याच जवळ तेवढेच तास आरामात बसून प्रवास करणारे
तरुण-तरुणही असतात. पण बसणारा एकही प्रवासी उभे राहणाऱ्या प्रवाशाला म्हणत नाही “तुम्ही बसा
पंधरा मिनिटे मग मी बसेन” असले प्रेमळ, आश्वासक, दिलासा देणारे शब्द नाहीत त्यांच्याकडे. एकदा तर
एक स्त्री कंडक्टर प्रवाशांना म्हणाली देखील, थोडा वेळ उभे राहणाऱ्यांना सुद्धा जागा द्या. त्यांचेही पाय
दुखत असतील ना? पण बसणाऱ्या प्रवाशांच्या कपाळावरील एक रेष हलेल तर शपथ! कंडक्टर बाईचा
फुकटचा संदेश तरी कोण ऐकणार?
मी तशीच उभी राहून डेक्कन जीम खाण्याच्या स्टॉपवर उतरत असे व तिथून रिक्षाने बालभारतीला जात
असे. तेथे दिवसभर म्हणजे कित्येकदा सायंकाळी सात पर्यंत आमची मीटिंग चालू राहायची. साधारण पाच
ते सात ही ऑफिस सुटायची वेळ. मग स्टॉप वर प्रवाशांची गर्दी सुरू! तिकडून येताना असाच प्रवास. क्वचित
एखाद्या दिवशी जागा मिळायची बसायला. पण उभ्याने प्रवास करताना दोन अडीच वर्षाच्या काळात
सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे एकदा ही सुखद धक्का बसला नाही. मी दीड दोन तास तरी उभी राहून
प्रवास करायचे. एके दिवशी माझ्या मनातील ही चलबिचल कुणीतरी ऐकली असावी.हे सदगृहस्थ स्वतः उभे
राहिले आणि म्हणाले “मॅडम या बसा माझ्या सीटवर थोडावेळ. मी उभा राहतो. वास्तविक त्याला माझ्याही
पुढच्या स्टॉपला उतरायचे होते.मला खूपच बरं वाटलं ते ऐकून. वयस्कर होते ते. मी त्यांच्याकडे बघून नको
म्हटले तर म्हणाले अहो बसा थोडा वेळ! तुम्हा स्त्रियांना घरी सुद्धा स्वयंपाकासाठी सकाळ संध्याकाळ उभेच
राहावे लागते. मला त्यांच्या या दुसऱ्या वाक्याने आणखीच बरे वाटले. खरे तर या वाक्याची आपण आपल्या
घरातल्या कडून अपेक्षा करीत असतो. पण घरातले तर सीटवर बसणाऱ्या प्रवाशापेक्षाही निर्दय असतात.
हा सहृदयी प्रवासी मात्र स्त्रियांचा विचार करणारा होता ज्या कुणा स्त्रीचा तो पती असेल ती किती नशीबवान
असेल! पुढील पंधरा मिनिटे मी सीटवर बसून प्रवास केला व ते गृहस्थ माझ्यासाठी पंधरा मिनिटे उभे राहिले.
एकदा एका लहान मुलाने आपल्या आजीला प्रश्न विचारला आजी आभाळ खाली का पडत नाही? आजी
म्हणाली, बाळ जगात प्रेमळ, सुशील, दयाळू, सुसंस्कारी, दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करणारी भक्कम
खांद्याची माणसे असतात. ती आभाळ पेलतात म्हणून आभाळ खाली पडत नाही.
