कडूलिंबाचे झाड
चार दिवसांपूर्वी माझ्या गावाहून एका मुलाने जवळजवळ 45 फोटो मला पाठविले. गावात चक्रीवादळ झालं होतं. पाऊसही पडला होता. आणि त्याने गावातील घरांची दाणादाण उडवली होती. कुणाच्या घरावरचे पत्रे लांब उडाले होते तर कुणाच्या घरात वारं शिरून घरातील कपडे आणि इतर वस्तू इतस्ततः विखुरल्या होत्या. कुणाच्यातरी बैलाच्या अंगावर झाड कोसळलं होतं व तो बैल जागच्या जागीच गतप्राण झाला होता. एकंदरीत नव्याने झालेल्या झोपडपट्टीलाच वादळाने मोठा तडाखा दिला होता. त्यामुळे झोपडपट्टीतील सर्व मुले, माणसे, स्त्रिया रस्त्यावर आल्या होत्या व एकमेकांची दुःखे एकमेकाजवळ सांगून रडत होत्या. नेहमीप्रमाणे गावातील पुढारी माणसे व त्यांचा गोतावळा पाहणी करायला आलेला होता. पण त्यांचं लक्ष वादळास बळी पडलेल्या घरांपेक्षा फोटोकडेच जास्त होतं. या फोटोत माझ्या शाळेचाही फोटो होता. शाळेच्या ऑफिस समोर कित्येक वर्षे जुने असलेलं कडुलिंबाचं झाड कोसळल होतं. ते कोसळलेलं झाड बघून माझ्या मनात चर्र झालं. त्या झाडाने माझ्या सर्व मोठ्या भावांचे, बहिणीचे, माझे व लहान भावांचे शिक्षण बघितले होते. गावातील जवळजवळ सर्वच सुशिक्षितांच्या साक्षरतेचा तो वृक्षराज साक्षीदार होता. झाडाला लागूनच हायस्कूलच्या चार खोल्यांचा व्हरांडा होता व्हरांडांच्या उंचीपेक्षा कमी उंचीला हेडमास्तरांचे ऑफिस व शाळेचे रेकॉर्ड असलेली खोली होती. हेडमास्तरांच्या पाठीमागे भिंतीवरचे घड्याळ होते. शाळा अर्धपेटीकंस च्या आकाराची होती. ह्या अर्धपेटी कंसाचे तोंड उत्तरेला होते. पश्चिमेकडच्या चार खोल्यात चौथा, सहावा व सातवा वर्ग भरीत असे. दक्षिणेकडील मधल्या भागात प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापकाचे ऑफिस व पाचवा वर्ग भरीत असे. तो एक मोठा हाॅलच होता. या हॉलमध्ये पाचवी अ आणि पाचवी ब हे दोन वर्ग भरीत असत. दोन वर्गांच्या मध्ये एक मोठा लांब बेंच ठेवलेला होता. नुसत्या मुलांचा पाचवा अ वर्ग व मुले मुली मिळून पाचवा ब वर्ग असायचा. आमचा ब वर्ग मुख्याध्यापकाच्या ऑफिसला लागूनच होता. पण ऑफिसमधलं आम्हाला काहीच दिसत नसे. कारण मध्ये लाकडी कपाटं उभी केलेली होती. तरीपण वर्गातील एका सरांचा तास संपल्यानंतर दुसरे सर वर्गात येईपर्यंत आम्ही मुली काही उचापती करायचो. दोन कपाटांच्या फटीतून हेडमास्तरांच्या रूममध्ये काय चालले ते पाहण्याचा आम्ही प्रयत्न करायचो. आम्हा मुलींची रांग कपाटाच्या बाजूनेच होती. कपाटाला आम्ही पाठ टेकून बसायचो. आणि फावल्या वेळेत हा उद्योग करायचो. त्यातून काही फारसे हाती लागणार नव्हते. काही फायदाही होणार नव्हता. वाटल्यास गुरुजींना रंगेहात दिसलो तर धपाटे मात्र मिळणार होते. पण आम्ही ग्रामीण विद्यार्थी! नको तिथे नाक खूपसायची आम्हाला सवय होती. त्यातलाच हा एक प्रकार होता.
एकदा मात्र धमालच झाली. दोन नकलाकार तरुण आमच्या शाळेत आले. सायंकाळी चारच्या दरम्यान त्यांनी काही नकला, गाणी म्हणून दाखविली. काही जोक्स सांगितले. एका जोक मध्ये त्यांनी सांगितले की, एक आजी तिच्या तीन नातींना घेऊन येत होती. वाटेतल्या एका गृहस्थाने आजींना त्या तीन नातींची नावे विचारली .आजीने मुलींकडे बोट करून नावे सांगायला सुरुवात केली. हिचे नाव उषा, गृहस्थ म्हणाला, बस् बस्! पुढे आता मला त्या दोघींची नावे समजली. दुसरीचे नाव गाद्या व तिसरीचे नाव सतरंज्या! जोक काही खास नव्हता. पण त्यावेळी तो आम्हाला फारच आवडला होता. आणि विशेष म्हणजे मुला मुलींनी मला तेव्हापासून चिडवायला सुरुवातच केली. उषा, गाद्या, सतरंज्या असे म्हणून. त्याच्याही पुढचा किस्सा असा की नकलांचा कार्यक्रम झाल्यानंतर हे तरुण हेडमास्तरांच्या ऑफिसमध्ये येऊन बसले. आणि आम्ही आमच्या त्या ग्रामीण सवयीने त्यांना फटीतून बघू लागलो. थोड्या वेळाने त्यांचेही लक्ष आमच्याकडे गेले. व हेडमास्तरांचा डोळा चुकवून तेही आमच्याकडे बघून हसू लागले. आमची मात्र पाचावर धारण बसली. कारण गावात त्यादरम्यान लहान मुलांना पळवून नेणारी माणसे आली अशी अफवा उठली होती. आणि ते नकलाकार पळवून नेणारे असावेत असे आम्हाला वाटत होते. तसे काही झाले नव्हते.
हे चक्रीवादळाचे फोटो पाहताना माझ्या त्या शाळेतील अनेक आठवणी जागृत झाल्या. मन बालपणात गेलं. फोटोतील शाळेच्या पटांगणातला तो झेंडा पाहता बरोबर गांधीजींची जन्मशताब्दी आठवली. आम्ही शाळेतील सर्व मुले “हाती धरून झाडू, तू मार्ग झाडेलासी” हे गीत म्हणून शाळेची स्वच्छता करीत होतो. त्या झेंड्याजवळच आमची प्रार्थना व्हायची. अकराला पाच मिनिटे बाकी असताना घंटेचा एक टोल वाजत असे व मुले प्रार्थनेसाठी ग्राऊंडवर जमा होऊन रांगेत उभे राहत. प्रार्थनेला वेळ होऊ नये म्हणून मुलांची वेळेत रांगेत उभे राहण्याची गडबड सुरू व्हायची.
एकदा रात्रीच्या वेळी आम्ही आमच्या घराच्या अंगणात जेवण केलं व स्वयंपाकाची भांडी मी घरात घेऊन जाऊ लागले. भाजीचं पातेलं घरात नेत असताना मध्ये ठेवलेला विळा मला दिसलाच नाही. माझी ठोकर त्या धारदार विळ्याला लागली व माझ्या उजव्या पायाचा अंगठा त्याने रक्तबंबाळ करून टाकला. अगदी नखात विळ्याचं पातं गेलं. व नखच वरती आलं. पण ते पूर्णतः मांसाच्या बाजूला झालं नाही, तर त्याची मागची बाजू मांसातच अडकून पडली. आणि पुढे मला त्याचा प्रचंड त्रास होऊ लागला. चालताना उठताना, बसताना हमखास त्या नखाला कधीतरी धक्का लागत असे. व पुन्हा ते रक्तबंबाळ होत असे. बरे त्यामुळे घरच्या कामातून किंवा शाळेतूनही सुटका नव्हती. त्यादरम्यान मला शाळेत जायला उशीर झाला व प्रार्थनेला हजर राहण्यासाठी मी जीवाचं रान करू लागली. दुखऱ्या पायाने मी रांगेत उभी राहिली. तेवढ्यात पुढच्या मुली जोरात एकमेकींना मागेपुढे ढकलू लागल्या व माझ्या पुढील मुलींचा पाय माझ्या त्या दुखऱ्या अंगठ्यावर पडला. वर आलेले नख जखमेत घुसून अंगठा पुन्हा रक्तबंबाळ झाला. पण कोणावरच राग काढता येईना. काही क्षणात प्रार्थना सुरू झाली व मी माझ्या जखमेच्या मुकवेदना सोसत प्रार्थना म्हणू लागली. पुढे तशाच रक्ताळलेल्या बोटाने वर्गात जाऊन मी सबंध दिवस शाळा केली. निसर्गाचा चमत्कार मात्र खरोखर विलक्षण आहे. तिथे नवीन नख येत होतं मला. पण जुनं मात्र फारच छळत होतं व ते तुटल्याशिवाय नवीन नखाचं सौंदर्य पुरेपूर पाहायला मिळणार नव्हतं. अनेक दिवस अशाच अनेक ठोकरा खात ते जीर्ण झालेलं नख गळून पडलं व माझी त्या असह्य वेदनातून सुटका झाली.
कडुलिंबाचं कोसळलेले झाड मला भूतकाळात अशाप्रकारे घेऊन गेलं. त्या लिंबाच्या झाडाच्या बाजूलाच पश्चिमेला तोंड करून हायस्कूलच्या हेडमास्तराचे ऑफिस होते. तेथे चांदभाई नावाचा तरुण शिपाई म्हणून काम करीत होता. आम्ही शाळेच्या बिल्डिंगच्या पश्चिमेकडे म्हणजे प्राथमिक शाळेत शिकत होतो तेव्हा आमचे चौथीचे खंडारे गुरुजी आम्हापैकी एखाद्या मुलाला वेळ पाहून यायला सांगायचे. आम्हाला घड्याळ समजत नव्हते. शाळेत घड्याळ समजावून सांगितले होते. पण वेळ पाहून यायला सांगितलं की किती वाजले ते कळतच नसे. मग आम्ही स्टूलवर बसलेल्या चांद भाईला विचारायचो. तो मागे मान वळवून घड्याळात पाही व आम्हाला वेळ सांगत असे. चांद भाई तिथे नसला म्हणजे मोठी पंचाईत होई. गुरुजी आम्हाला घड्याळ समजले असे गृहीत धरून किती वाजले ते पाहायला पाठवीत. पण चांद भाई तिथे नसला तर वेळ कुणाला विचारायची? मग मुले मनाने काहीही ठोकत. चारची वेळ असेल तर मुले दोन, तीन वाजले असे सांगत व गुरूजींच्या माराचे धनी होत. तसेही गुरुजी सदान् कदा आम्हाला मारीतच. त्यामुळे मुले शाळा लवकर सुटायची वाट पाहत. आमच्या वर्गातील कौशल्या नावाची एक मुलगी तर नेहमी गुरुजीच लक्ष फळ्याकडे असले म्हणजे बाहेर जाई व वर्गाची सावली पाहून शाळा सुटायला किती वेळ आहे हे मनातल्या मनात ओळखून घेई. मधली सुट्टी दोन वाजता होई. एका तासात मुले घरी जाऊन दुपारचे जेवण करीत व पुन्हा शाळेत हजर होत. काही दुपारची शाळा चुकवत. तर शाळेत आलेली सायंकाळची घंटा कधी वाजते याची वाट पाहत. असे सर्व जुने प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. आणि चक्रीवादळात उखडून गेलेल्या त्या कडुलिंबाच्या झाडाने माझ्या डोळ्यात अश्रूंची दाटी केली.
प्रा.उषा काळे
9890562820
