December 8, 2025
Gay

थंडीच्या लाटेची शक्यता- आपल्या जनावरांचा थंडीपासून बचाव करा !
लातूर जिल्हा पशुसंवर्धन विभागाचा पशुपालकांना आवाहन

लातूर, दि. ०९ : अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे लातूर जिल्ह्यात तापमान झपाट्याने कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार नोव्हेंबरच्या उत्तरार्धात थंडीची लाट जाणवू शकते. ही स्थिती विशेषतः ग्रामीण भागातील पशुधनासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या जनावरांचा थादिपासून बचाव करण्यासाठी उपायोजना करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी केले आहे.

जनावरांच्या शरीराचे तापमान कमी झाल्यास त्यांना हायपोथर्मिया, श्वसनाचे आजार, दूध उत्पादनात घट, आणि अचानक मृत्यू यांसारख्या घटना घडू शकतात. नवजात वासरे, अशक्त आणि दुभती जनावरे या काळात सर्वाधिक जोखमीच्या गटात येतात. या जनावरांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी जनावरांना उबदार निवारा तयार करावा. गोठ्याभोवती पडदे लावावेत, पत्र्याच्या छपरावर वाळलेले गवत पसरावे. जमिनीवर वाळलेला चारा किंवा कडब्याचा थर ठेवावा. थंडी फार वाढल्यास गोठ्यात कृत्रिम प्रकाश किंवा बल्ब वापरावा. धूर निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.

जनावरांना थंड पाणी देऊ नये, दिवसातून ३–४ वेळा कोमट पाणी द्यावे. पूरक खाद्य, खनिज मिश्रण, मीठ, व जीवनसत्वांचा वापर करून जनावरांना संतुलित आहार द्यावा. अशक्त आणि गाभण जनावरांना अतिरिक्त पौष्टिक खाद्य द्यावे जनावरांचा गोठा कोरडा ठेवावा, तसेच दररोज साफ करा वा. ओलावा व धूर टाळावा, गोठ्यात तुळस, लेमनग्रास किंवा दनरूडी यांच्या जुड्या लटकवल्यास कीटक दूर राहतात. लाळखुरकुत, घटसर्प, पीपीआर, एफएमडी, बीक्यू, एचएस यांसारख्या रोगांविरुद्ध लसीकरण करून घ्यावे. कृमी नियंत्रणासाठी वेळोवेळी औषधे द्यावीत. आवश्यक औषधे, सलाईन आणि इलेक्ट्रोलाइट्सचा साठा तयार ठेवावा.

नवजात वासरे, करडी, अशक्त, दुभती व आजारी जनावरे यांना उबदार ठिकाणी ठेवावे. रानात जनावरे ठेवू नयेत. त्यांच्यासाठी उबदार शेड तयार करावे. मेंढ्यांची लोकर कापणी थांबवावी. कोंबड्यांच्या शेडला रात्री पडदे लावावेत आणि तापमान २१–२३°C ठेवावे. पक्ष्यांना कोमट पाणी व पौष्टिक खाद्य द्यावे,.

जनावरांमध्ये थरथर, सुस्ती, अन्न न खाणे, श्वास घेण्यास त्रास, त्वचा काळसर पडणे, दूध उत्पादन घटणे अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधा. सरकारी रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधे व तज्ज्ञ कर्मचारी उपलब्ध आहेत. थंडीची लाट ही नैसर्गिक आपत्ती असली तरी तिचा परिणाम कमी करणे आपल्या हातात आहे. वेळेवर तयारी, गोठ्यातील व्यवस्थापन, आणि पशुवैद्यकीय सल्ल्याचे पालन यामुळे आपण आपले पशुधन सुरक्षित ठेवू शकतो, असे डॉ. शिंदे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright 2025. All right reserved. www.samtapatra.online Website Design by E- MEDIA Web & App - 7999906109
error: Content is protected !!