बुद्धांच्या महापरिनिब्बानाची संपूर्ण कथा
वैशालीचे ते दिवस. पावसाने ओथंबलेले रस्ते, निसर्गाच्या हिरव्या छटा, आणि वैशालीच्या नागरिकांच्या मनात एकच भावना—बुद्धांविषयीची अपार श्रद्धा. त्या सकाळी बुद्धांनी शहराची शेवटची भेट घेतली. विशाल सौंदर्याने भरलेल्या त्या नगराकडे त्यांनी थोडा वेळ शांतपणे पाहिले. “हे माझे वैशाली,” त्यांच्या नजरेत जिव्हाळा होता — आणि एक निःशब्द निरोप.
वैशालीहून बाहेर निघताना मार्गात प्रसिद्ध नर्तकी अम्बापाली भेटली. अम्बापालीने अत्यंत आदराने बुद्धांना भोजनास आमंत्रण दिले आणि बुद्धांनी ते स्वीकारले. पुढे लिच्छवी राजांनीही आमंत्रण दिले, पण ते स्वीकारले नाही. त्या रात्री अम्बापालीने दिलेले भोजन संपूर्ण भिक्षुसंघासह बुद्धांनी घेतले.
पुढील प्रवासात ते बेलुवग्रामात आले. येथेच त्यांनी वस्सावास — पावसाळ्याचा मुक्काम म्हणून शांततेत निवांत राहण्याचा निर्णय घेतला. पण या काळात बुद्धांचे शरीर दुर्बल होत गेले. आजार गडद होत होता. एकदा तर त्यांना इतके प्रखर वेदना झाल्या की आनंदाचे मन थरारले. पण बुद्ध शांत होते. त्यांनी म्हणाले,
“आनंदा, आता मी वयस्कर झालो आहे. पण लक्षात ठेव धम्म आणि विनयच माझ्या नंतर तुमचे अधिष्ठान असेल.”
वस्सावास पूर्ण झाल्यावर ते पुढे निघाले . गोजग्राम, पाटलीग्राम, नादिका, पावा. प्रत्येक ठिकाणी लोकांनी त्यांचे अनमोल शब्द ऐकले, हृदयाला टेकणारी शिकवण अनुभवली.
पावा येथे लोहाराच्या मुलगा चुंद यांनी मोठ्या भक्तीभावाने बुद्धांना भोजन अर्पण केले. बुद्धांनी ते स्वीकारले, पण जे भोजन त्यांनी घेतले ते त्यांच्या शेवटच्या आजाराचे कारण ठरले. चुंद अस्वस्थ होऊ नये म्हणून बुद्धांनी विशेष सांगितले — “चुंद, तुझ्यावर कोणतेही पाप नाही. उलट प्रचंड पुण्य आहे.”
चुंदच्या घरातून बाहेर पडताच बुद्ध अति दुर्बल झाले. आनन्दाने त्यांना आधार देत कुशीनगरकडे नेले. त्या मार्गातील धुळकट वाट, दुपारचे उष्ण ऊन आणि बुद्धांचे क्षीण होत जाणारे पाऊल… पण त्यांच्या मुखावर कधीही तक्रारीची छटा नव्हती — फक्त शांतता.
शेवटी ते कुशीनगरच्या बाहेर सालवनात पोहोचले. दोन उंच सालवृक्षांच्या मध्ये त्यांनी आसन घेतले आणि उत्तराभिमुख शय्यासनाला टेकले. सालवृक्षांनी त्या क्षणी अद्भुत फुलांचा वर्षाव केला — ज्याला लोकांनी दैवी संकेत मानले.
आनंद शेजारी बसला होता. त्याचे मन भरून आले होते. बुद्धांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला:
“आनंदा, तू मला वर्षानुवर्षे अतुलनीय सेवाभावाने जपले आहेस. तुझे पुण्य अपरंपार आहे.”
मल्ल लोक आले, भिक्षुसंघ जमला. बुद्धांनी शेवटचा उपदेश केला:
“अत्तदीपा भव, विहराज —
स्वत:चा दीप बना; स्वतःवर आणि धर्मावर आधार ठेवा.”
रात्र गडद होत गेली. मंद वा-यात पानांची सळसळ आणि भिक्षूंच्या शांत आस्वस्थतेत तो क्षण जवळ येत होता.
बुद्धांनी शेवटचे वचन उच्चारले:
“वयधम्मा संखारा; अप्पमादेन संपादेथ.”
(सर्व संस्कार नाशवंत आहेत; अप्रमादाने प्रयत्न करा.)
यानंतर ते ध्यानात गेले — प्रथम पहिल्या झानात, मग दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या… पुन्हा उलट क्रमाने. आणि पुन्हा चौथ्या ध्यानात स्थिर होत ते परिनिब्बानित झाले.
शांत, निर्मळ, दुःखाच्या सर्व बंधनांपलीकडचे ते निर्वाण.
त्या रात्री संपूर्ण कुशीनगर निःशब्द झाला. जणू जगच काही काळ थांबून गेले होते.
सात दिवसांनी मल्ल लोकांनी महाकश्यप आल्यानंतर राजमानाने त्यांचे अंतिम संस्कार केले. बुद्धांच्या अस्थी धातूंना आठ भागांत विभागून आठ स्तूप उभारले गेले , एक राखेवर व एक पात्रावर असे एकूण दहा स्तुप उभारले गेले.
आणि अशा प्रकारे —
एक मानव, एक गुरु, एक जागृत पुरुष —
ज्यांच्या ज्ञानाने संपूर्ण मानवजात उजळली,
त्यांनी शेवटच्या शांत श्वासात जगाला अनंत प्रकाश देऊन गेले.
– ज्योती चाकणकर, पुणे
