प्रा. यशवंतराव केळकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्थायी कार्यकर्त्यांचे लातूरमध्ये भव्य एकत्रीकरण
लातूर/प्रतिनिधी: लातूर शाखेच्या वतीने ७ डिसेंबर रोजी स्वर्गीय प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष व पुण्यस्मरणाच्या निमित्ताने स्थायी कार्यकर्त्यांचे दिवसभराचे एकत्रीकरण उत्साहात पार पडले. लातूर, उदगीर, धाराशिव आणि अंबाजोगाई येथील शेकडो स्थायी कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून संघटनात्मक कामात सातत्याने योगदान देण्याची तयारी दर्शवली.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री संजय पाचपोर (सहकार भारती, राष्ट्रीय संघटन मंत्री) उपस्थित होते. तसेच श्री देवदत्त जोशी (अभाविप, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री) यांनी प्रमुख उपस्थिती नोंदवत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
दिवसभर चाललेल्या या एकत्रीकरणात संघटन बळकटीकरण, युवा सहभाग, सामाजिक उपक्रम, भविष्यातील नियोजन या विषयांवर विविध सत्रांद्वारे चर्चासत्रे झाली. प्रा. यशवंतराव केळकर यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवत, कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अधिक प्रभावी पद्धतीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांच्या योगदानाचे कौतुक करत संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा देण्याचे आवाहन केले.
