राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत २४ बालकांवर होणार हृद्यरोग विषयक उपचार
• जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पालकांशी संवाद
• पुणे येथील विविध रुग्णालयांमध्ये होणार उपचार
लातूर, दि. १० : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सन २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील अंगणवाडी आणि शासकीय, निमशासकीय शाळांमधील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची व विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये हृद्यदोष आढळलेल्या २४ बालकांवर पुणे येथील विविध नामांकित रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रिया केली जाणार असून यासाठी ही बालके रवाना झाली. यानिमित्ताने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या पालकांशी संवाद साधला.
आरोग्य उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, डॉ. आनंद कलमे तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची वर्षातून दोन वेळा आणि ६ ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची वर्षातून एक वेळा आरोग्य तपासणी केली जाते. यासाठी जिल्ह्यात ३० पथकांची तपासणी करण्यात आली आहे. बालकांमध्ये आढळणारे जन्मतः असलेले व्यंग, लहान मुलांमधील आजार, जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार व दिव्यांगत्व याचे वेळीच निदान व उपचार होण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम उपयुक्त ठरत आहे. सन २०२५-२६ या वर्षात जिल्ह्यातील एकूण १ हजार २९९ बालकांमध्ये दृष्टीदोष, ४ हजार ६०१ बालकांमध्ये दातांचा आजार आढळून आला आहे. त्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे. तसेच या वर्षात ४७ बालकांवर तिरळेपणावरील शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
स २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील संशयित हृद्यदोष आढळलेल्या २२४ बालकांची टू-डी एको तपासणी करण्यात आली. तसेच ५६ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आणखी २४ बालके शस्रक्रियेसाठी रवाना झाली आहेत. पुणे येथील रुबी हॉल, ग्लोबल हॉस्पिटल, इनलॅक्स हॉस्पिटल येथे या बालकांवर आवश्यक शस्त्रक्रिया होणार आहेत.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत आरोग्य तपासणीमुळे बालकांमधील आजाराचे लवकर निदान व उपचार होणे शक्य होत आहे. हृद्यदोष असलेल्या बालकांवर मोफत उपचार करण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील पालकांना दिलासा मिळत आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अधिक व्यापक स्वरुपात राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी सांगितले.
